
उत्तर प्रदेशातील अलीगढ-कासगंज मार्गावर शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माउंट इंटरनॅशनल स्कूलच्या खटारा बसमधील फ्लोरिंगचा पत्रा अचानक तुटल्याने यूकेजीमध्ये शिकणारी 8 वर्षांची विद्यार्थिनी अनन्या चालत्या बसमधून खाली पडली आणि थेट मागच्या चाकाखाली चिरडली गेली. या भीषण अपघातात अनन्याचा जागीच मृत्यू झाला असून, शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. अनन्या नेहमीप्रमाणे तिचा मोठा भाऊ गोलू याच्यासोबत शाळेतून घरी परतत असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस ढोलणा परिसरात पोहोचली असताना अनन्या ज्या सीटवर बसली होती, त्याखालील सडलेला पत्रा अचानक कोसळला. अनन्याला डोळ्यादेखत खाली पडताना पाहून तिचा भाऊ गोलूने आरडाओरडा केला, मात्र चालक बस थांबवेपर्यंत अनन्या चाकाखाली आली होती. अपघात घडल्यानंतर चालकाने रक्तबंबाळ झालेल्या अनन्याला उचलून बसच्या मागच्या सीटवर ठेवले आणि ती केवळ जखमी झाल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्य समोर येताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या चालकाला पकडून चोप दिला आणि रस्ता रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांच्या ताफ्याने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
बसच्या फ्लोरिंगचा पत्रा तुटला आणि विचित्र अपघात झाला, 8 वर्षीय चिमुकलीचा करुण अंत pic.twitter.com/HWIS8aCNxw
— Saamana Online (@SaamanaOnline) March 1, 2026
अनन्याचे वडील रवी, जे गंगिरी चौकात सार्वजनिक सेवा केंद्र चालवतात, आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूने पूर्णपणे खचले आहेत. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका चिमुकलीचा शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे करुण अंत झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक संजीव कुमार यांनी माहिती दिली की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वडिलांच्या तक्रारीवरून शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, शाळा व्यवस्थापनाने या घटनेला केवळ ‘अपघात’ असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



























































