27 वर्ष नवऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या सुप्रसिद्ध गायिकेचा संघर्ष तुम्हालाही थक्क करेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक काळ होता जेव्हा आयटम नंबर्सपेक्षा सुमधूर गाणी तुफान गाजत होती. त्या काळात उदयास आलेल्या एका गायिकेचा आज वाढदिवस आहे. गोड गळ्याच्या या गायिकेचा आजवरचा प्रवास हा सोपा नव्हता. वैयक्तिक आयुष्यात तिला बराच संघर्ष करावा लागला. या संघर्षात तिला 27 वर्ष, नवऱ्यापासून वेगळं राहावा लागलं. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलतोय तिचं नाव आहे अलका याज्ञिक.  अलका याज्ञिक यांनी ‘प्यार की झंकार’, ‘मेरे अंगने मे’ या सारख्या गाण्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आजही त्यांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.

अलका याज्ञिक यांनी वयाच्या अवघ्या 14 वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. त्यांच्या नावावर 2 हजारपेक्षा जास्त गाणी आहेत. 16 भाषांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या अलका याज्ञिक या हिंदी चित्रपटसृष्टीतील सफल गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी मिळवलेलं यश हे डोळे दीपवणारं असलं तरी त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अनेकांना माहिती नाहीये. अलका यांचं लग्न 1989 साली झालं होतं. शिलाँगचे रहिवासी असलेले नीरज कपूर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. दोघांमध्ये कोणतीही कटुता अथवा वाद नसतानाही या दोघांना 27 वर्ष वेगळं राहावं लागलं होतं.

नीरज कपूर हे व्यावसायिक आहेत. बायकोची यशस्वी कारकीर्द पाहाता नीरज यांनी त्यांचा व्यवसाय मुंबईमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईत ते व्यवसायात यशस्वी होऊ शकले नाही, त्यांना मोठं आर्थिक नुकसानही सहन करावं लागलं होतं. यामुळे अलका याज्ञिक यांनी त्यांना शिलाँगमध्येच आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता.  यामुळे नीरज यांनी पुन्हा शिलाँगला जाण्याचा निर्णय घेतला होता.  अलका याज्ञिक यांचा सल्ला ऐकल्याने नीरज यांना फायदाच झाला, कारण त्यांचा व्यवसाय पुन्हा तेजीच्या मार्गावर स्थिरावला.

अलका यांनी नवऱ्याच्या संघर्षाच्या काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. त्यांनी आपल्या मुलांचं पालन पोषणही एकटीने पार पाडलं.  नीरज यांना जेव्हा केव्हा संधी मिळायची तेव्हा ते अलका याज्ञिक आणि मुलांसोबत येऊन राहात होते.  मात्र बहुतांश वेळ अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांनी एकमेकांपासून दूर  राहूनच घालवला आहे. असं असलं तर या दोघांच्या नात्यात दुरावा कधीच आला नाही.