All About नागपंचमी

>> आसावरी जोशी

कहाकर बुद्रुक.. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील छोटेसे गाव. लोकसंख्या जेमतेम २०००. विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवर हे गाव आहे. जमीन बाराही महिने ओलिताची.. सर्व ऋतुंमध्ये हिरवळ भुईभार झालेली.. शेती तिन्ही त्रिकाळ कंच हिरवी.. शेतकरी बाराही महिने शेतीच्या कामात लागलेले.. या हिरव्यागार गावात सापही अगदी मुबलक आणि माणसांपासून पूर्ण अभय घेऊन वावरतात. त्यांना माणसांची भीती वाटत नाही.. हिरवळीवर त्यांचा मुक्त संचार असतो. यामागचे महत्वाचे कारण म्हणंजे येथील गावकऱ्यांनी आतापर्यंत एकही साप मारलेला नाही.
डॉ. भास्कर पाटील. यांनी गावकऱ्यांच्या मनात सापाविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले आहेत. स्वत: साप पकडण्याचे प्रशिक्षण घेऊन आतापर्यंत पाच हजाराच्या वर सर्प वाचवले आहेत. डॉ. भास्कर १९९८ पासून वन्यजीव तसेच सर्परक्षणाचे काम करतात. जिल्ह्यात कुठेही साप निघाल्यास ते त्वरित त्याला पकडण्यासाठी जातात. आणि पकडून त्याला वनात सुरक्षित सोडून देतात. शिवाय गावातील प्रत्येक व्यक्तीला सापाविषयी माहिती सांगतात.. तो शत्रू नसून मित्र आहे असे त्यांच्या मनावर ठसवतात. मुक्या प्राण्यांना आणि सापांना वाचवण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे. केवळ कहाकर गाव आणि आजूबाजूच्या २० किलोमीटर परिसरात कोणीच सापाला मारत नाही. किंबहुना त्या सापाला इतर गावकऱ्यांकडून त्रास होणार नाही, इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतात. गावातील मुलानाही डॉ. भास्करनी प्रशिक्षण दिले आहे. गावातील मुलांनी आतापर्यंत एक हजार सापांना जीवदान दिले आहे.
या निसर्गातील प्रत्येक प्राणीमात्र स्वत:चे वेगळे महत्व अधोरेखित करतो. यामध्ये साप, नाग हादेखील महत्वपूर्ण घटक आहे. पण केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागांत सुद्धा साप निघणे म्हणजे काहीतरी भयानक घटना समजून प्रथम त्या सापाला मारायचे कसे हे ठरवले जाते. हे वन्य जीव, प्राणी एवढे सभ्य असतात की ते स्वत:हून माणसांच्या वाट्याला कधी जात नाहीच.. उलट तेच माणसांपासून आपल्या जीवाला घाबरतात. काही गोष्टींची काळजी आपण माणसांनी घेतली तर हा संघर्ष बऱ्यापैकी टाळता येईल.
साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल?
घराजवळ पाला पाचोळा साचू देऊ नका. भिंतीच्या भेगा, बिळे बुजवून टाका. गोवऱ्या, सरपणाची लाकडे घरापासून दूर आणि उंचावर ठेवा.शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नका. कचरा घरापासून लांब टाका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाळीव प्राणी, कोंबड्या, पोपट, ससे उंचावर ठेवावे.
आपल्या देशात २७८ जातीचे साप आहेत. यापैकी केवळ ७२ साप विषारी आहेत. महाराष्ट्रात ५२ जातीचे साप आहेत. त्यापैकी फक्त १० सापच विषारी आहेत. या १० सापांपैकी आपला फक्त चार विषारी सापांशी संपर्क येतो. बाकीचे सहा साप दुर्मिळ असून त्यातील दोन साप महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी तर चार साप सह्याद्रीत सापडतात. पावसाळ्यात उंदीर, बेडूक, सरडे, पाली अशा भक्ष्यांकडे आकर्षित होऊन साप आपल्या घराच्या आसपास येतात. आणि बहुतांश हे साप विषारी नसतात. आणि अगदी ते विषारी असलेच तरी जोपर्यंत आपण त्यांना काही करत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. सापांविषयी अनाठायी भीती, अज्ञान व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात. यातून सापांच्या अनेक जाती दुर्मिळ झाल्या आहेत.
सापाला मारण्याची काहीच गरज नसते. एक तर तो माणसांना घाबरतो. त्याच्या मेंदूचा विकास झालेला नसल्याने त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही. सापांना सहा फुटापलीकडे अंधुक दिसते. त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही. शिवाय आता अगदी गावांतूनही सर्पमित्र तयार झाले आहेत, त्यांना बोलावल्यास सापांचा जीवही वाचेल आणि माणसांच्या मनातील भीतीही कमी होईल.