ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन, सिंधूला सोपा ड्रॉ, सायनाची वाट बिकट

जागतिक अजिंक्यपद विजेती हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आगामी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे. तिला स्पर्धेसाठी सोपा ड्रॉ लागला आहे. अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सायनाची स्पर्धेतील वाट तशी बिकटच असेल असे जाणकारांचे मत आहे. मात्र आव्हानाचा जिद्दीने सामना करणारी सायना पुन्हा चमकदार खेळ करीत या स्पर्धेत चमकदार कामगिरी साकारेल असा तिच्या चाहत्यांना विश्वास आहे.

तोंडावर आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऑल इंग्लंड स्पर्धा यंदा 17 ते 21 मार्च या कालावधीत होणार असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूची गाठ पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चियाशी पडणार आहे. सिंधूने अपेक्षेनुसार कामगिरी केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिला अकाने यामागुची, तर उपांत्य फेरीत पॅरिलीना मारिनचा सामना करावा लागू शकतो. सायनासमोर मात्र सलामीलाच डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्डचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे तिला आपल्या अनुभवाचा कस लावत विजयासाठी झुंजावे लागणार आहे.

पुरुष गटात हिंदुस्थानच्या आशा कश्यप, श्रीकांत यांच्यावर

पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यपला पहिल्याच फेरीत क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जपानच्या पेंटो मोमोटाविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे. किदम्बी श्रीकांतचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआटरेशी होईल, तर एच. एस. प्रणॉयला मलेशियाच्या ल्यू डॅरेनशी दोन हात करावे लागतील. पुरुष दुहेरीत हिंदुस्थानच्या दोन जोडय़ा सहभागी होणार आहेत, तर महिला आणि मिश्र दुहेरीत हिंदुस्थानच्या प्रत्येकी तीन जोडय़ा खेळतील. ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी 3 मार्चपासून स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची कामगिरीदेखील ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या