त्याचा झंझावात वर्ल्ड कपमध्ये दिसणार; यशस्वीच्या पदार्पणाबाबत सर्वांनाच लागले वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर धडकणारा यशस्वी जैसवाल नावाचे वादळ आता लवकरच हिंदुस्थानी संघात दिसण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या दोन सामन्यांत 124 आणि 98 धावांची खेळी करून यशस्वी हिंदुस्थानी संघाचे दार तोडून जवळजवळ आत गेलाय आणि आता केवळ त्याच्या नावाची औपचारिक घोषणा व्हायचीय, अशी स्तुतिसुमने चक्क हिंदुस्थानचे माजी दिग्गज खेळाडूच या नव्या सलामीवीरावर उधळत आहेत. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी जैसवालने टीम इंडियात एण्ट्री केली तरी कुणाला याचे आश्चर्य वाटणार नाही. कारण तो त्याचा हक्कच आहे, अशी सर्वांची आतापासून भावना झाली आहे.

यशस्वीची यंदाच्या आयपीएल मोसमातील फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली आहे. प्रत्येक क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन यशस्वीच्या खेळाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. गुरुवारी  इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात तर यशस्वीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले. त्याने गुरुवारी 13 चेंडूत 50 धावांची तुफानी खेळी साकारली होती.

त्याचा झंझावात पाहून हरभजन सिंग तर अक्षरशः भारावला. त्याचे तोंडभरून कौतुक करताना यशस्वी हा खूप प्रतिभावान खेळाडू असल्याचे तो म्हणाला. यशस्वीच्या खेळीवरून हिंदुस्थानी क्रिकेटचे भविष्य उत्तम  हातामध्ये असल्याचीही भावना हरभजनने बोलून दाखवली. त्याची फलंदाजी हिंदुस्थानी संघाचे दार ठोठावत नसून ते दार मोडत असल्याचे हरभजन म्हणाला आणि हे वादळ हिंदुस्थानात होणाऱया वर्ल्ड कपपूर्वी संघात दिसेल, असेही भाकीत वर्तवले.

मी असतो तर जैसवाल टीम इंडियात असता

मी निवड समितीमध्ये असतो तर आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी यशस्वी जैसवालचा हिंदुस्थानी संघात नक्कीच समावेश केला असता, असे उद्गार हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने काढले. मला यशस्वीच्या फलंदाजीत हिंदुस्थानच्या माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची झलक दिसते. मला खात्री आहे की रोहित शर्मादेखील ते पाहत असेल. कारण हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विश्वचषकासाठी त्याच्यासारख्या फलंदाजांच्या शोधात असेल, असेही रैना म्हणाला.

यशस्वी, रिंकूसारख्या प्रतिभावान खेळाडूंचा विचार व्हावा – रवी शास्त्री

हिंदुस्थानच्या टी-20 संघामध्ये प्रतिभावान युवा खेळाडूंचा समावेश करण्याची वेळ आली आहे. टीम इंडिया आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष पेंद्रित करत असेल, तर निवडकर्त्यांनी यशस्वी आणि रिंकूसारख्या तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्यावर भर दिला पाहिजे. पुढील तयारीच्या दृष्टीने या प्रतिभावान खेळाडूंना ‘फास्ट ट्रक’ केले पाहिजे, असे मत हिंदुस्थानच्या संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

राणाने फोडले  फलंदाजीवर खापर

यशस्वी जैसवालच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानने कोलकातावर एकहाती विजय मिळवला. गुरुवारच्या पराभवामुळे यंदाच्या मोसमातील कोलकाचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. 9 विकेट राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकाताचा कर्णधार नितीश राणा नाराज झाला होता. त्याने या पराभवाचे खापर फलंदाजीवर पह्डले. सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. या खेळपट्टीवर 180 धावा करणे गरजेचे होते, मात्र आम्ही धावा करण्यात कमी पडलो, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. तसेच यशस्वीने केलेल्या खेळीचे राणाने कौतुक केले.