नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्रित निवडणुका लढणार, पत्रकार परिषदेत घोषणा

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, काँग्रेस हे सर्व विरोधी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढतील, अशी माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. भ्रष्ट आणि हुकूमशाही भाजपसह महायुतीला पराभूत करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

नाशिकच्या हॉटेल वैदेही येथे सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, राज्य संघटक विनायक पांडे, मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, माकपा नेते, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली. याबाबतचा अहवाल सर्व पक्षांच्या वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना सर्व पक्षांच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत, असेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.