
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत आज बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. पाकिस्तानविरोधात केंद्र सरकारने जी ठोस भूमिका घेतली आहे त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. संकटाच्या काळात आम्ही सर्व सरकारसोबत असून हम सब एक हैं, अशी एकमुखी ग्वाही यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.
हिंदुस्थानातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱया पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी दिल्लीत बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशाच्या ऐक्याचे दर्शन घडले. राजकीय विरोध बाजूला ठेवून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ ंिसह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री जयशंकर, संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना गटनते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, द्रमुकचे टी. आर. बालू, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
ही एकतेची वेळ – राहुल गांधी
आम्ही एकजूट आहोत आणि सुरुवातीपासूनच सरकारसोबत आहोत. काही विषय आहेत, पण ठीकय आहे. ही एकतेची वेळ आहे. आम्ही सर्वांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
संकटाच्या काळात देशासोबत -मल्लिकार्जुन खरगे
संकटाच्या काळात आम्ही सर्व देशासोबत आहोत आणि देशहितासाठी आम्ही सरकारला साथ देऊ, असे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने काही गोपनीय गोष्टी त्यांनी बैठकीत मांडल्या नाही. पंतप्रधान मोदी बैठकीला उपस्थित नव्हते काही हरकत नाही. आम्ही सर्व विरोधी पक्षातील लोक सरकारसोबत आहोत, असे कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
…तर सणसणीत उत्तर देऊ – राजनाथ सिंह
‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच असून हिंदुस्थानी सैन्य अकल्पनीय काम करत आहे. जर कोणी कधी आमच्या संयमाचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कालप्रमाणेच सणसणीत उत्तर देऊ, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
लढाऊ गणवेशात रणरागिणी
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या लढाऊ गणवेशात अवतरल्या. या ड्रेस कोडचा विशेष अर्थ आहे. कोणतेही ऑपरेशन, युद्धावेळी हा पोशाख परिधान केला जातो. लढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेशच यातून या रणरागिणींनी दिला आहे.