निनावी राजकीय जाहिरातबाजीला निवडणूक आयोगाचा दट्टय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक प्रचारातील जबाबदारी आणि पारदर्शकता निश्चित व्हावी यासाठी प्रचाराचे बॅनर, हार्ंडग्जसह सर्व छापील प्रचार साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव स्पष्टपणे देण्याचे आदेश आज निवडणूक आयोगाने दिले.

महापालिकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या हार्ंडग्जच्या जागांवर मुद्रक वा प्रकाशकाची नावे नसलेली हार्ंडग्ज लावली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे आयोगाने म्हटले आहे. आपनेही अलीकडेच हा मुद्दा आयोगाकडे उपस्थित केला होता.

दिल्ली महापालिकेच्या सूचना

पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचारासाठी राजकीय जाहिरातींना परवानगी देताना एखादा पक्ष किंवा उमेदवाराच्या विरोधात कोणतीही राजकीय जाहिरात देण्यास मनाई आहे, अशा सूचना याच महिन्यात दिल्ली महापालिकेने आपले अधिकारी आणि जाहिरात फलक कंत्राटदारांना दिल्या आहेत. याकडेही आयोगाने लक्ष वेधले.

 

सरकारी खर्चाने राजकीय जाहिरातबाजीसही मनाई

सत्तेत असलेल्या पक्षाच्या किंवा सरकारच्या प्रसिद्धीसाठी सरकारी तिजोरीतून खर्च करून राजकीय जाहिरात करणेदेखील प्रतिबंधित आहे, असे आयोगाने निदर्शनास आणून दिले आहे. जाहिरात मंजूर करण्यासाठी जबाबदार असलेल्या नियुक्त प्राधिकरणाचे प्रमाणपत्र/मंजुरी मिळाल्यानंतरच राजकीय जाहिराती प्रदर्शित केल्या जातील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. यासंदर्भातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 127 अ कडे आयोगाने लक्ष वेधले.