देशाची तीनही दलं आणखी पॉवरफुल होणार, 67 हजार कोटींच्या संरक्षण करारांना मंजुरी

देशाची संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने डिफेन्स एक्विझिशन काऊंन्सिलच्या (डीएसी) बैठकीत सुमारे 67 हजार कोटी रुपयांचे संरक्षण करार मंजूर केले. या निर्णयामुळे सैन्यदल, वायुसेना आणि नौदलाला एकाच वेळी अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, उपकरणे व संरक्षण प्रणाली मिळेल. ‘आत्मनिर्भर भारत’ उद्देश गाठताना सर्व उपकरणे स्वदेशी रूपात विकसित करण्याचा उद्देश आहे. अत्याधुनिक युद्धतंत्राचा अवलंब करण्याबरोबरच ते स्वदेशातच विकसित करण्याची सरकारची योजना आहे.

लष्करासाठी माऊंटन रडार खरेदी

सैन्यदलाच्या बीएमपी वाहनांसाठी थर्मल इमेजर-आधारित नाईट साईट्स तंत्रज्ञान वापरले जाईल. हे प्रगतशील तंत्र बीएमपीच्या इंफंट्री फाईटिंग व्हिकलमध्ये लावले जाईल. ज्यामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत प्रभावी हालचाल आणि लढाई शक्य होईल. रात्रीच्या अंधारातही जवान आपल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतील. माऊंटन रडार आणि स्पायडर वेपन सिस्टम अपग्रेड यासारख्या विशेष रडारच्या खरेदीमुळे खडकाळ पर्वतीय प्रदेशांमध्ये विशेषतः संवेदनशील सीमावर्ती भागात देखरेख क्षमता वाढेल. स्पायडर सिस्टम अपग्रेड, इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टमला बळकटी मिळणार असून लष्कराची ताकद वाढणार आहे.

नौदलासाठी ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टम

नौदलाची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सरफेस क्राफ्टच्या (सीएएससी) खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. ही मानवरहित जहाजे नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्ध क्षमतांना बळकटी देतील. शत्रूच्या पाणबुड्या आणि समुद्री घुसखोरांना शोधू शकतात. याव्यतिरिक्त नौदलाला ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टम आणि लाँचर मिळेल.

ब्रह्मोत्र क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि बराक – 1 प्रणाली अपग्रेड या क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये सुधारणा केल्याने नौदलाच्या हल्ल्याची अचूकता वाढेल आणि हवाई धोक्यांपासून संरक्षण क्षमता सुधारेल, ज्यामुळे प्रमुख सागरी क्षेत्रांचे रक्षण करण्याची नौदलाची ताकद वाढेल.

हवाई दलासाठी ः आधुनिक युद्धात हवाई दलाची भूमिका निर्णायक ठरत आहे. हे लक्षात घेऊन नौदलाला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ठेवले जात आहे. त्यासंबंधी प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. प्रगत माऊंटन रडार यंत्रणेमुळे उंच क्षेत्रांवर देखरेख आणि हवाई हल्ल्यांना उत्तर देणे सोपे होईल. सक्षम आणि स्पायडर वेपन सिस्टम अद्ययावत केल्याने हवाई दलाची रिअ‍ॅक्शन टाईम आणि फायर पॉवर जलद होईल.

तीनही दलाला अत्याधुनिक ड्रोन

तीनही दलाला मिडीएम अल्टीट्यूड लाँग अँड्यूरन्स (मेल) रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टम ड्रोन्स मिळतील. हे अत्याधुनिक ड्रोन लांब पल्ल्यापर्यंत देखरेख ठेवू शकतात. शस्त्रास्त्र, पेलोड वाहून जाऊ शकतात. अचून स्ट्राईक मिशनसाठी उपयुक्त ठरतील.