कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप; चंदा कोचर यांनी हायकोर्टातील याचिका घेतली मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण झाल्याचा आरोप कर्मचारी महिलेने केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व इतर चौघांनी त्या महिलेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र लैंगिक शोषणाचा खटला केवळ एका मॅनेजरविरुद्ध चालला व त्यात तो मॅनेजर निर्दोष सुटला याकडे लक्ष वेधत चंदा कोचर व इतर चौघांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली.

लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिला 2004 पासून वाशी येथील आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयात कर्मचारी होती. 2013 मध्ये तिने बँकेतील वरिष्ठ अधिकाऱयांना ईमेल पाठवून तिच्या रिपार्ंटग मॅनेजरच्या वागणुकीबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या तक्रारीकडे बँकेने दुर्लक्ष केले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. तसेच चंदा कोचर व अन्य चौघांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा संबंधित महिलेने केला होता. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या चंदा कोचर व इतरांनी त्या महिलेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र लैंगिक शोषणाचा खटला केवळ एका मॅनेजरविरुद्ध चालला व त्याची निर्दोष सुटका झाली आहे, असे चंदा कोचर यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले. त्याआधारे खंडपीठाने चंदा कोचर व इतर चौघांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.