अन्नपदार्थ वितरण सेवा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी द्या, ‘आहार’ची सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे उपाहारगृहे सध्या रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन असून या मर्यादेमुळे उपाहारगृहे, बार आणि या व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वेळेची ही मर्यादा वाढवून रात्री 12 वाजेपर्यंत करा आणि अन्नपदार्थ वितरण सेवा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार)ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबईत उपाहारगृहे आणि बारमधील सेवा सध्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढवावी. कारण उपाहारगृहे चालवण्याच्या सध्याच्या वेळा अडचणीच्या ठरत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या सोयीसाठी अन्नपदार्थ वितरण सेवा 24 तास उपलब्ध करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, अशी विनंती ‘आहार’ ने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तर शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. दरम्यान, या उद्योगाद्वारे केवळ रोजगार संधीच उपलब्ध केल्या जात नाहीत तर अन्य संबंधित क्षेत्रांनादेखील मोठय़ा प्रमाणात मदत होते. म्हणून सरकारने पाठबळ द्यावे, असे ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे.