‘पुष्पा 2’ चं शुटींग मध्येच थांबलं, या कारणाने रिलिज रखडणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pushpa-2

‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, फायर है फायर, झुकेगा नहीं…!’ असा दणदणीत डायलॉग बोलत धुमाकूळ उडवून देणारा दक्षिणेकडील सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा’ (pushpa) चा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. मात्र ‘पुष्पा 2’ ची वाट पाहणाऱ्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटानं सर्वच भाषांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ‘ पुष्पा 2’ (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र, आता हे शुटिंग मध्येच थांबलं आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, तेलुगू सिनेसृष्टीत संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण काही काळासाठी रखडलं आहे. संप मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा ‘ पुष्पा 2’ च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. त्यामुळे चित्रपटाचा दुसरा भाग नक्की कधी येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ कथाही तशीच राहणार की काही बदल होणार, असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.