अमळनेरला पांढरे सोनेही झाले होम क्वारंटाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे पांढरे सोने म्हणून संबोधला जाणारा कापूस विक्री अभावी घरात पडून असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यात कापुस घरात पडुन असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

परिसरात यावर्षी सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावरच खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. दरम्यान तुरळक पावसावरच पिके कसे बसे आले. खुरपणी, कोळपणी,रासायनिक खतांचा डोस, कीटकनाशक फवारणी आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. मशागतीवर झालेला खर्च निदान निघेल अशी उमेद शेतकऱ्यांना होती. मात्र हिवाळ्यात तब्बल दोन आठवडे बेमोसमी पाऊस पडल्याने असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे कपाशी वेचणीला आलेल्या बोंडाचे कोंब फुटले तर कपाशीचे बोंड सडून नासाडी मोठ्या प्रमाणात झाली होती.

दरम्यान पावसाच्या उघडणी नंतर खुरपणी, वखारी, रासायनिक खतांचा डोस व कीटकनाशक फवारणी नंतर पीक परिस्थिती सुधारली. यावेळी कापूस वेचणी एकाचवेळी आल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी दुप्पट भावाने वेचणीचा भुर्दंड झाला. त्यातच कापूस खरेदी केंद्रेही उशिरा सुरु करण्यात आली. दरम्यान सुरु करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्रे लॉकडाऊन मुळे 20 मार्च पासून बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली. परिसरात नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कपाशी पीक उत्पादन घेतलेले असून या पिकावर जवळील सर्व खर्च केल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने कापूस खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. अमळनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. साठवलेला कापसामुळे आर्थिक अडचणी बरोबरच समस्या निर्माण होत आहेत.