
मुळाथडी परिसरातील अंमळनेर येथे मुळा नदीतून वाळू उत्खनन करून वाळू डेपो निंभारी येथे करण्यास ग्रामस्थांचा विरोध कायम असून, आज तिसऱया दिवशीही उपोषण सुरूच होते. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील गावांनी आज बंद पाळून नेवासा-राहुरी मार्गावरील करजगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. उद्या (14 रोजी) परिसरातील महिला रस्त्यावर उतरणार आहेत. दरम्यान आंदोलकांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या घरावर मोर्चा नेला.
संपत किशन पवार (वय 76) असे तब्येत खालावलेल्या उपोषणकर्त्याचे नाव आहे.
वाळू उत्खनन, तसेच डेपो त्वरित रद्द करावा, यासाठी मुळाकाठच्या गावांनी शासनाच्या विरोधात अंमळनेर-करजगाव रस्त्यावरील लक्ष्मी कॉर्नर येथे उपोषण सुरू केले आह़े आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज मुळाकाठच्या अंमळनेर निंभारी, खुपटी, तिळापूर, इमामपूर, गोणेगाव, वांजुळपोई करजगाव, वाटापूर, पानेगाव, मांजरी खेडले परमानंद, शिरेगाव, वाटापूर पाचेगाव आदी गावांमध्ये बंद पाळण्यात आला. या गावांचे नागरिक उपोषणात सहभागी झाले आहेत. नेवासा-राहुरी मार्गावरील करजगावात ‘रास्ता रोको’ केला.
आज परिसरातील ‘गाव बंद’ आंदोलन, तसेच ‘रास्ता रोको’ करण्यात आला. दरम्यान, आंदोलकांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरावर मोर्चा नेला. यावेळी तहसीलदार हे आंदोलकांना सामोरे गेले. त्यांनी मोर्चेकऱयांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. चौथ्या दिवशी महिला रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रवरेच्या तिरी असणाऱया पाचेगावात आज बंद पाळण्यात आला
आमदार शंकरराव गडाख यांचा पाठिंबा
आमदार शंकरराव गडाख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना गडाख म्हणाले, मी तुमच्या पाठीमागे ठाम उभा असून, मुळा नदीपात्रातील एकही खडा उचलू देणार नसून, आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर अख्खा तालुका आंदोलनकर्त्यांच्या मागे उभा करीन, असे त्यांनी सांगितले.































































