अ‍ॅमेझॉनचे दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन, हिंदुस्थानात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

मायक्रोसॉफ्टनंतर अ‍ॅमेझॉनने हिंदुस्थानात 35 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यातून दहा लाख नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.

अ‍ॅमेझॉनने बुधवारी सांगितले की, ते 2030 पर्यंत देशातील त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये ते 35 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून ते व्यवसाय वाढवण्यावर तसेच डिजिटायझेशन आणि निर्यात वाढीवर लक्ष पेंद्रित करणार आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून दहा लाख अतिरिक्त नोकऱया निर्माण करण्याची आणि 1.5 कोटी लघू व्यवसाय आणि हिंदुस्थानी ग्राहकांना एआय सुविधा देण्याची त्यांची योजना आहे.

अ‍ॅमेझॉनचे अधिकारी अमित अग्रवाल म्हणाले की, या गुंतवणुकीद्वारे एआय क्षमतांचा विस्तार, पुरवठा साखळीतील सुविधा वाढवणे, लहान व्यवसाय वाढवण्यास पाठिंबा देणे आणि रोजगार निर्मिती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही हिंदुस्थानच्या विकासात योगदान दिले आहे. इथली अ‍ॅमेझॉनची वाढ आत्मनिर्भर आणि विकसित हिंदुस्थानच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आम्ही लहान व्यवसायांसाठी, लाखो नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि मेड-इन-इंडियाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.  2010 पासून अ‍ॅमेझॉनने हिंदुस्थानात जवळ जवळ 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच एकूण ई-कॉमर्स निर्यातीत 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त योगदान दिले आहे.