पाणी प्रश्नावरून अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल; संजय शिरसाट यांना ‘मौनी बाबा’ म्हणत लगावला टोला

छत्रपती संभाजीनगर शहरातील भीषण पाणी प्रश्नावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाण्यासंदर्भात नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आता छत्रपती संभाजीनगरात प्रचारासाठी येण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, अशा शब्दांत दानवे यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेषतः मंत्री संजय शिरसाट यांचा उल्लेख करत त्यांनी ‘जलसाम्राट’चे बॅनर लावणारे मंत्री आता पाण्याच्या प्रश्नावर ‘मौनी बाबा’ झाले आहेत, असा सणसणीत टोला लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत महायुतीवर निशाणा साधला. पाणीपुरवठा योजनेच्या कामात आलेले अपयश झाकण्यासाठी आता अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. स्वतःच्या अपयशाचे खापर अधिकाऱ्यांवर फोडणे म्हणजेच महायुतीने आपला पराभव मान्य केल्याचा पुरावा आहे, असे दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्वी दिलेल्या एका आश्वासनाची आठवण करून दिली. जयसिंगपुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना शिरसाट यांनी डिसेंबर 2025 पर्यंत वाढीव पाणी न दिल्यास शहरात प्रचाराला येणार नाही, असे जाहीर केले होते. या विधानाचा संदर्भ घेत दानवे यांनी म्हटले की, आता डिसेंबर महिना उलटून गेला आहे, तरीही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शिरसाट यांनी आता प्रचाराला येऊच नये. एकेकाळी ‘जलसाम्राट’ म्हणून मिरवणाऱ्या मंत्र्यांनी आता या गंभीर प्रश्नावर मौन पाळल्याने जनतेत संतापाची लाट आहे.