विरोधकांना भुईसपाट करत महायुतीच्या अंबादास दानवेंचा दणदणीत विजय

7269

संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे 524 विक्रमी मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांना 107 मते मिळाली. या निवडणुकीतील शहानवाज यांना केवळ ३ मते मिळाली असून, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. 5 टेबलवर करण्यात आलेली मतमोजणी 1 तास 20 मिनिटात संपली. या निवडणुकीत एकुण 657 पैकी 647 मतदान झाले होते. मतमोजणी दरम्यान प्रारंभी वैध मतांची मोजणी करण्यात आली. यावेळी एकुण 647 मतापैकी 14 मते बाद ठरली. यातील 10 मतपत्रिका कोऱ्या आढळून आल्या तर 4 मतपत्रिकांवर नियमानुसार पसंती क्रमांक टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे 633 मते वैध ठरली. नियमानुसार एकुण वैध मतांनुसार उमेदवाराला विजय मिळविण्यासाठी 317 मतांचा कोटा देण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी पहिल्या पसंतीचे 524 मते मिळविली. ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा दानवे यांनी तब्बल 207 मते जास्तीचे घेत 418 मतांनी दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसचे भवानीदास कुलकर्णी यांना केवळ 107 मते मिळाली. आयोगाच्या परवानगीनंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी उदय चौधरी यांनी सकाळी 10 वाजुन 20 मिनिटांनी निकाल जाहीर केला.

काँग्रेस-एमआयएमची मते फुटली
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह एमआयएमचे 213 मते फुटली. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना-भाजपाचे 292 आणि युती पुरस्कृत 35 असे 333 सदस्य म्हणजे मतदार होते. मात्र महायुतीचे अंबादास दानवे यांना 524 मते मिळाली. काँग्रेस-आघाडीसह एमआयएमचे 319 सदस्य असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास यांना केवळ 106 मिळाले.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विजय : दानवे

संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अंबादास दानवे यांनी हा विजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रत्येक अन् प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचे, हे आमचे आता उद्दीष्ट राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या