
मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील स्मृतिवन आणि स्मारकाला विलंब झाला आहे. बाळासाहेबांच्या पुतळय़ाला सात वर्षांनंतरही मान्यता मिळालेली नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ग्वालिअर दगडापासून बनणाऱया पुतळय़ाला मान्यता कधी देणार आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 2016 मध्ये एमजीएम विद्यापीठाशेजारील प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरकारकडून 35.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 23 कोटी रुपये देण्यात आले आहेत, मात्र स्मारकाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. याबाबत विक्रम काळे यांनी प्रश्नोतरांच्या तासाला प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्मारकाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे, वस्तुसंग्रहालयाचे काम पूर्ण झाले आहे, तलावाचे काम सुरू आहे, बाळासाहेबांचा 54 फुटी ग्वालिअर स्टोनचा पुतळा होता तो तोच ठेवायचा की दुसरा पुतळा उभारायचा त्यावर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. शिवसेनाप्रमुखांची भाषणे, चित्रफिती आणि प्रदर्शनाबाबत दोन सदस्य असलेल्या तज्ञांची समिती नियुक्त केली जाईल आणि त्यांच्याकडून अहवाल घेतला जाईल, अशी माहिती दिली.





























































