फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध, अंबादास दानवेंनी दिला पुरावा

फलटण येथील महिला डॉक्टरने भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केला होता. या दबावामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच रात्री एक ट्विट करत दानवे यांनी पुरावाही दिला.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने ऐन दिवाळीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आत्महत्येपूर्वीच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा आणि त्याचा सहकारी प्रशांत बनकरने मानसिक व शारिरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

अंबादास दानवे यांनी मुंबईत या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पत्रकार परिषद घेऊन या केसमध्ये सत्तेचा दुरुपयोग व राजकीय दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली. या डॉक्टर महिलेनें पोलिस उपअधिक्षकांकडे तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे केलेल्या पत्राव्दारे केलेल्या तक्रारीचा अंबादास दानवे यांनी दाखला दिला. या तरुणीने लिहिलेल्या पत्रात दबावाचा उल्लेख केला होता. पोस्टमार्टेम रिपोर्ट व फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी काही नेत्यांकडून दबाव होता असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजेंद्र शिंदे व नाग टिळक या दोन स्वीय सहाय्यकांनी रुग्णालयात येऊन डॉक्टर तरुणीला त्यांच्या माजी खासदारांशी फोन वरून बोलणे करून दिल्याचे अंबादास दानवे म्हणाले. डॉक्टर तरुणी बीडची असल्यामुळे पोलिस उपनिरिक्षक गोपाळ बदने याने हिणवले. अशा दबावामुळेच या डॉक्टर तरुणीने स्वतःचे जीवन संपवले. सुसाईड नोटमध्ये हे स्पष्टपणे नमूद केल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.

या घटनेवरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावरही टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या प्रभावामुळे डॉक्टरांवर दबाव, पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास सांगणे यामध्ये सत्तेची मस्ती दिसून येते. या प्रकरणात महिला डाँक्टरांची सातारा जिल्ह्यात चौकशी होऊ नये आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करावे. महाडिक नावाच्या पोलिस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ट्विटमध्ये काय

आज मुख्यमंत्री देवेंद्र त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा.

१. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला.. असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक २१ ते ३१ यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.

२. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी ‘आपण बीडचे असल्याने आरोपीला ‘फिट’ देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे’ असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.

३. दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.

४. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे!

आता एवढं दिल्यावर तपास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पी आय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल. बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच. कायद्याचे न उरले भान, देवाभाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान..! असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले.