
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी विचारले असता त्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी आधी कर्जमाफीसाठी समिती काम करतेय असे सांगितले नंतर कर्जमाफीसाठी समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या गोंधळलेल्या अवस्थेवरून सध्या त्यांच्यावर टीका होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट करत सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. ”कर्जमाफीसाठी आता समिती स्थापन करणार असे महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले. बावनकुळेजी, आपल्याच पक्षाचे नेते नितीन गडकरीजी एक गोष्ट कायम सांगतात, ‘इच्छा तिथे मार्ग… जिथे इच्छा नाही तिथे येते सर्वेक्षण, अभ्यास, समित्या, उपसमित्या आणि अहवाल.. हे सगळं येतं. आज आपण समितीचा खडा मारून पाहिलात, यातच आपली आणि आपल्या सरकारची राजकीय इच्छाशक्ती दिसली… राहु द्या, हे तुमच्याने होणार नाही”, असा टोला अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.