घरपोच भाजीपाला विक्रीचा अंबाजोगाई पॅटर्न यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ ही संकल्पना अंबाजोगाई शहरात अत्यंत प्रभावी व यशस्वी ठरली आहे. दीड कोटी रुपयांचा भाजीपाला घरपोच विक्री करून अंबाजोगाई पॅटर्न जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अंमलात आणलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांमधील सोशल डिसटन्सिंग ठेवणे सर्व भाजीपाला विक्रेते शेतकरी गटांना बंधनकारक केले आहे. भाजीपाला घेऊन रस्त्यावर अथवा बाजार मांडून बसता येत नसल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होऊन शेतकऱ्यांना घरबसल्या स्वस्त दराने फळे व भाजीपाला मिळत आहे. या सर्व 138 गटांनी मिळून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अंबाजोगाई शहरामध्ये दीड कोटी रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री केली असून हा उपक्रम जिल्यात सर्वात यशस्वी ठरला आहे.

विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव यांनी या उपक्रमाची स्तुती केली असून सातत्य राखण्याचे गटांना आवाहन केले. विभागीय कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी येडेश्वरी शेतकरी गट सनगाव या शेतकरी गटास शुक्रवारी भेट दिली. शेतकरी गटामार्फत भाजीपाला व फळे विक्रीच्या उपक्रमास मार्गदर्शन केले. यावेळी माजी जि.प.शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, मंडळ कृषी अधिकारी राजाराम बर्वे, गोविंद ठाकूर, बाळासाहेब शेळके, कृषी पर्यवेक्षक सुरेश ढाकणे, कृषी सहायक पंडित काकडे, तोडकर यांची उपस्थिती होती.

अंबाजोगाई तालुक्यातील ग्राहकांना रोजच्या रोज ताजी फळे व भाजीपाला मिळावा तसेच बाजारातील गर्दी टाळता यावी अशा दुहेरी उद्देश्याने तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने 138 शेतकरी गटांना भाजीपाला व फळे विकण्याचा परवाना देण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील इच्छुक शेतकरी गटांना परवाने देण्यात आले. या शेतकरी गटांची अंबाजोगाई शहरातील 14४ प्रभागांमध्ये विभागण्यात आले. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागातील व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप व तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटांचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे सर्व कर्मचारी रोज गटांवर नियंत्रण ठेवतात. तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्याना दंड करतात. त्यामुळे शहरातील अवैध भाजीपाला विक्री बंद झाली.

तालुकास्तरावर भाजीपाल्याचे दर ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती रोजच्या रोज असे दर ठरवते की शेतकरी व ग्राहक दोघांचा फायदा होईल. तसेच हे दरफलक वाहनावर लावने सर्व गटांना बंधनकारक आहे. त्यामुळे ठरलेल्या दरापेक्षा जास्त किमतीला विक्री होत नाही. तसेच ग्राहकांमधील सामाजिक अंतर ठेवणे सर्व गटांना बंधनकारक केले आहे. या सर्व गोष्टीमुळे बाजारातील गर्दी कमी होऊन शेतकऱ्यांना घरबसल्या स्वस्त दराने फळे व भाजीपाला मिळत आहे. या सर्व 138 गटांनी मिळून लॉकडउनच्या कालावधीमध्ये तब्बल अंबाजोगाई शहरामध्ये दीड कोटीची विक्री केली असून हा उपक्रम जिल्यात अत्यंत यशस्वी ठरला आहे.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक यांनी भेटी दरम्यान या उपक्रमाची कौतुक केले. यामध्ये सातत्य राखण्याचे गटांना आवाहन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी गटांना तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने संपूर्ण सहकार्य राहील व ही शेतकरी ते ग्राहक विक्री प्रक्रिया लॉक डाऊन नंतरही सुरू ठेवण्याचा मानस असून शेतकरी गटांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे असे आवाहन केले आहे.