
सामना ऑनलाईन। अंबाला
हिंदुस्थानी हवाई दलाला सध्या राफेल या लढाऊ विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे. राफेल विमानांना शत्रुराष्ट्रांकडून नाही तर कबुतरांकडून धोका निर्माण झाला आहे. अंबाला एअरबेसजवळ मोठ्या संख्येने कबुतरांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे आकाशात उड्डाण करताना कबुतरे अचानक विमानांना धडकत असल्याने राफेलला दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे या कबुतरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी हवाई दलाने केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंबाला एअरबेसजवळ राहणाऱ्या बहुतेक नागरिकांनी कबुतरे पाळली आहेत. यामुळे अनेकवेळा विमान उड्डाणावेळी विमान हवेत झेपावताना ही कबुतरे विमांनाना धडकतात. यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे एअरबेसजवळ राहणाऱ्या नागरिकांना कबुतरे पाळण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी हवाई दलाने केली आहे.
काही दिवसांपूर्वी हवाई दलाच्या विमानाला पक्षाने धडक दिल्याने मोठी दुर्घटना होणार होती. मात्र पायलटने प्रसंगवधान दाखवत विमानाला असलेल्या अतिरिक्त इंधन टाक्या जमिनीवर फेकल्या. त्यावेळी मोठा स्फोट झाला व आगीच्या ज्वाळा उसळल्या. पण पायलटने अंबाला एअरबेसवर विमान उतरवल्याने मोठा अनर्थ टळला होता.
























































