लोकलमुळे भीम अनुयायांचे हाल,घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकात गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज विलंबाने धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशीही विलंबाने धावत होत्या. सुमारे अर्धा तास उशिराने धावणाऱ्या लोकल गाडय़ांमुळे बाबासाहेबांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जात असलेल्या भीम अनुयायांना मोठा त्रास सहन करावा लागला.  घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळणार असल्याने राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरसाठी आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे सरकारी कार्यालये बंद होती; परंतु इतर खासगी कार्यालये, विविध कंपन्यांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे आधीच लोकल गाडय़ांना गर्दी होती. त्यातच सकाळपासूनच लोकल गाडय़ा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अनेक अनुयायांनी आपला मोर्चा मुंबई दर्शनाच्या दिशेने वळवला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानकातही मोठी गर्दी होती.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी शिवसेना संघटक विलास रुपवते यांनी चैत्यभूमी येथे आकाशात बलूनच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.