
>> प्रवीण कारखानीस
डॉ. आंबेडकर हे वर्ष 1921-22 मध्ये लंडन येथे शिक्षण घेत होते. त्या काळात ते 10 किंग हेन्री रोड, लंडन येथे वास्तव्यास होते. या घराचं रुपांतर डॉ. आंबेडकर यांचं उचित स्मारक तसंच त्यांच्या जीवनाशी निगडित वस्तूंचं संग्रहालय यात करण्याची योजना आखली आहे.
हिंदुस्थानसारख्या जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राच्या जगातल्या सर्वात मोठय़ा आणि मजबूत संविधानाचे द्रष्टे शिल्पकार आणि दलित-शोषित समाजाचे भाग्यविधाते ‘भारतरत्न’ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे 1921-22 या काळात लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एक विद्यार्थी म्हणून ज्या तीन मजली घरात राहत होते ते घर मी स्वतः पूर्वी एकदा मुद्दाम पाहून आलो होतो. त्यावेळी त्याच्या मालकांनी ते विक्रीसाठी काढलं होतं. पुढे ते महाराष्ट्र शासनाने तब्बल 33 लक्ष ब्रिटिश स्टर्लिंग पौंड म्हणजे सुमारे 33 कोटी रुपये विक्रीमूल्य देऊन विकत घेतलं आणि त्या घराचं रूपांतर डॉ . आंबेडकर यांचं उचित स्मारक तसंच त्यांच्या जीवनाशी निगडित वस्तूंचं संग्रहालय यात करण्याची योजना आखली. 14 नोव्हेंबर 2015 रोजी या वास्तूचे औपचारिक उद्घाटन करण्यात आलं . त्यानंतर त्या वास्तूची डागडुजी , दुरुस्ती , रंगरंगोटी , स्मारकाला साजेल अशा फर्निचरची खरेदी, डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोंची आणि वस्तूंची जमवाजमव करून त्या वास्तूची योग्यप्रकारे सजावट करण्यात तब्बल 30 महिने निघून गेले. सरतेशेवटी डॉ. आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती दिनाचा सुयोग साधून 14 एप्रिल 2018 या दिवशी ती वास्तू परिपूर्ण स्वरूपात जनतेसाठी खुली करण्यात आली.
मी जेव्हा ही वास्तू पाहायला आलो तेव्हा मला दरवाजाबाहेर बाजूच्या भिंतीवर मला निळ्या रंगाची गोल तबकडी दिसली. त्यावर पांढऱया अक्षरात लिहिलं होतं ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956) इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस, लिव्हड हियर, 1921-1922’ अशा प्रकारच्या गोल, निळ्या तबकडय़ा लंडनमधल्या ज्या वास्तूत पूर्वी थोर साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, क्रीडापटू, समाजधुरीण अथवा अन्य क्षेत्रातले दिग्गज राहून गेले होते त्यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या दिसतात. त्यांवर ज्यांच्यातर्फे त्या लावल्या गेल्या आहेत त्या ‘इंग्लिश हेरिटेज’चं किंवा लंडन महानगरीच्या बरो-कौन्सिलचं नाव नोदवलेलं असतं. अख्ख्या लंडनमध्ये अशा प्रकारच्या 900 तबकडय़ा लावलेल्या आहेत. राजाराम मोहन रॉय, रवींद्रनाथ टागोर, सावरकर, गांधी, टिळक, नेहरू ही मंडळी एकेकाळी ज्या घरांत राहून गेली होती त्या घरांबाहेर लावलेल्या तबकडय़ा मी स्वतः बघितल्या होत्या. मात्र ज्या कॅमडेन बरो-कौन्सिलच्या भागात अशा मानाच्या तबकडय़ा लावलेली तब्बल 170 थोरामोठय़ांची निवासस्थानं आहेत. त्याच भागात असलेल्या महामानव डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाबाहेरच्या त्या गोल निळ्या तबकडीवर लंडनच्या ‘बरो-कौन्सिल ऑफ कॅमडेन, लंडन’चा किंवा ‘इंग्लिश हेरिटेज’चा उल्लेख मला आढळला नाही. यापूर्वी मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा या घराचा दरवाजा निळ्या रंगाचा होता जो नूतनीकरणानंतर आज अन्य घरांच्या दरवाजांप्रमाणे दुधासारखा शुभ्रधवल होता. सुदैवानं दरवाजा उघडलेला होता.
उंबरठय़ावर विनम्रतेनं माथा टेकवून मी आत प्रवेश केला. त्याबरोबर एक तरुण अदबशीरपणे पुढे आला आणि त्याच्या सांगण्यानुसार मी समोरच ठेवलेल्या वहीत माझ्या शिरस्त्यानुसार देवनागरी लिपीत माझ्या नावाची नोंद केली. त्या तरुणाचं नाव होतं फवाद. मूळचा तो पुद्दचेरीचा असल्याचं मला त्याच्याकडूनच समजलं. बहुधा त्या स्मारकाची दैनंदिन देखभाल करण्याची जबाबदारी तूर्तास आपल्या उच्चायुक्त कार्यालयानं स्वीकारली असावी. डाव्या हाताला असलेल्या प्रशस्त दिवाणखान्यात मी पाऊल ठेवलं. दुपारचे 12 वाजून गेले होते. दिवाणखान्याच्या पारदर्शी खिडक्यांच्या तलम, झिरझिरीत नक्षीदार, पांढऱयाशुभ्र पडद्यांतून आतवर येऊन पसरलेली सूर्यकिरणं त्याही वेळी कोवळीच वाटत होती, मात्र त्यांच्यामुळे दिवाणखान्यातलं वातावरण उबदार आणि अधिक चैतन्यमय झालं होतं. उंची सोफासेट, देखणं कॉफीटेबल, पुस्तक-मांडणी आणि अर्थातच डॉ. आंबेडकर यांचं भव्य छायाचित्र यामुळे संपूर्ण दिवाणखाना शोभिवंत वाटत होता. डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेनं मांडणी छान सजली होती. समोरच्या भिंतीवर डॉ. आंबेडकर यांचं एक इंग्रजी वचन झळकत होतं ‘डेमॉक्रसी इज इसेन्शिअली ऍन ऍटिटय़ूड ऑफ रिस्पेक्ट ऍण्ड रेव्हरन्स टोवर्डस् अवर फेलोमेन’ लोकशाहीची इतकी सारगर्भ व्याख्या जगात अन्य कुणी केली असेल असं मला तरी वाटत नाही. याच दिवाणखान्याच्या अन्य भिंतीवर डॉ. आंबेडकर यांनी 12 फेब्रुवारी 1933 रोजी पुण्यातल्या येरवडा कारागृहाच्या पत्त्यावर महात्मा गांधी यांना पाठवलेल्या टंकलिखित इंग्रजी पत्राची फोटो कॉपी लावलेली होती.त्या पत्राखालची त्यांची स्वाक्षरी पाहून माझं मन अगदी भरून आलं. डॉ. आंबेडकर यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया विद्यापीठाकडून प्रथम मास्टर्स डिग्री मिळवली होती. पाठोपाठ राज्यशास्त्र विषयातली ‘डॉक्टरेट’ मिळवली होती. इंग्लंडमधल्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’कडून अर्थशास्त्र विषयातली ‘डॉक्टरेट’ मिळवली होती. या दोन्ही सर्वोच्च पदव्या त्यांनी त्या त्या विषयाचे दोन अत्यंत विद्वत्तापूर्ण, संशोधनपर प्रबंध सादर करून मिळवल्या होत्या. त्यासंबंधीचे त्यांचे दुर्मिळ फोटो मला तिथं पाहता आले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधले सहाध्यायी आणि प्राध्यापक यांच्यासमवेतचा त्यांचा फोटो, हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्यासमवेतचा त्यांचा फोटो, हिंदुस्थानच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातले कायदा आणि न्याय खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून शपथग्रहण करतानाचा त्यांचा फोटो, देशविदेशातल्या अनेक थोर व्यक्तींबरोबरचे त्यांचे फोटो, बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतरचा त्यांचा आणि त्यांच्या द्वितीय पत्नी सविता ऊर्फ माई आंबेडकर यांचा फोटो असे अनेक फोटो या एकाच वास्तूत पाहता येतात हे मला महत्त्वाचं वाटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या ज्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून या वास्तूचं उद्घाटन केलं होतं तोच अर्धपुतळा इथं दिवाणखान्यात ठेवलेला आहे. त्याशिवाय एक पूर्णाकृती पुतळा मागील बाजूच्या बागेत उभा आहे. भगवान गौतम बुद्धांची ब्राँझची सुंदर मूर्तीही इथं आहे. वरच्या मजल्यावर अभ्यासिका व समृद्ध ग्रंथसंग्रह आहे.
बाजूच्या प्रशस्त शयनगृहात डॉ. आंबेडकर यांच्या वडिलांचा फोटो आहे. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या प्रथम पत्नी रमाबाई यांचा एकमेकांसोबतचा अत्यंत दुर्मिळ फोटो मला याच शयनगृहात पाहायला मिळाला. या दांपत्याला चार मुलगे आणि एक मुलगी अशी पाच अपत्यं झाली होती, मात्र ‘यशवंत’ नावाच्या एका मुलाचा अपवाद वगळता बाकी सगळेच आपल्या कोवळ्या वयात मरण पावले होते. रमाबाई स्वतःदेखील अल्पायुषी ठरल्या होत्या. त्यांनाही अवघं 37 वर्षांचेच आयुष्य लाभलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषानं ऐन उमेदीच्या काळात आपल्या वैयक्तिक जीवनात असे कितीतरी आघात झेलले होते, अशी कितीतरी दुःख पचवली होती. बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून सीमित कालावधीसाठी मिळालेली रकमेची शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेला गेले होते आणि न्यूनतम कालावधीतच तिथली मास्टर्स डिग्री मिळवून शिवाय पी.एचडीसाठी प्रबंध सादर करून त्याच शिष्यवृत्तीवर ते तडक लंडनला आले होते. लंडनच्या वास्तव्यात त्यांनी लंडन विद्यापीठाची मास्टर्स डिग्री तर मिळवलीच शिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पी. एचडीसाठी प्रबंध सादर केला आणि हे करत असतानाच ते लंडनमधल्या ग्रेज इन् मधून ‘बॅरिस्टर’सुद्धा झाले. इतकी प्रचंड विद्वत्ता असलेल्या या महापुरुषानं याच 10 किंग हेन्री रोडवरच्या या वास्तूत राहत असताना कधी अर्धपोटी राहून तर कधी पूर्ण उपाशी राहून आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं.
तहानभूक यांची जराही पर्वा न करता त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत तासन्तास बसून मोठमोठय़ा ग्रंथांचं वाचन केलं, टिपणं काढली आणि लंडनमधलं आपलं इप्सित साध्य होताच ते पेटारेभर मौल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकं घेऊन बोटीनं मायदेशी परतले. पुढे गोलमेज परिषदांच्या निमित्तानं त्यांचं जेव्हा जेव्हा लंडनला येणं झालं तेव्हा तेव्हा त्यांनी हिंदुस्थानातल्या दलित समाजाच्या व्यथा-वेदना सर्वांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडल्या. उच्चवर्णीयांकडून दलित समाजाला मिळत असलेली हीनतेची वागणूक बघता दलितांसाठी वेगळे मतदारसंघ तयार करण्याची जोरदार मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली ज्याचे पडसाद जगभर उमटले. अशा या महामानव डॉ. आंबेडकर यांचं त्यांच्या विद्यार्थीदशेतलं लंडनमधलं निवासस्थान जे आज त्यांचं सुंदर स्मारक म्हणून साकारलं आहे ते मी याचि देही याचि डोळां पाहून कृतकृत्य झालो.


























































