
अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेला नेण्यात आले असून हा देश आता आम्ही चालवणार अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यामुळे जगात एकच खळबळ उडालेली असताना व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलत उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांची अंतरिम राष्ट्रपतीपदी नियुक्ती केली आहे. शनिवारी याबाबत आदेश जारी करण्यात आला.
शनिवारी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. अमेरिकेची दीडशे विमाने व्हेनेझुएलामध्ये घुसली आणि तुफान बॉम्ब वर्षाव केला. यात 40 हून अधिक लोक ठार झाले. अमेरिकेने लष्करी कारवाई करत राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी तातडीने एक आदेश जारी करत उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याकडे देशाच्या अंतरिम राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली.
प्रशासकीय सातत्य आणि राष्ट्राचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी डेल्सी रॉड्रिग्ज व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारतील. राष्ट्रपती मादुरो यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर चौकटीवर न्यायालय पुढील विचारमंथन करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
Reuters reports – The Constitutional Chamber of Venezuela’s Supreme Court ordered that Vice President Delcy Rodríguez assume the role of acting president of the country in the absence of Nicolás Maduro, who was detained early Saturday morning in an operation by U.S. forces. pic.twitter.com/Xot1JNwA6d
— ANI (@ANI) January 4, 2026
मादुरो यांना मुक्त करण्याची मागणी
दरम्यान, व्हेनेझुएलामध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर डेल्सी रॉड्रिग्स यांनी एक ऑडिओ संदेश जारी करत निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी जिवंत असल्याचे पुरावे अमेरिकेकडे मागितले असून त्यांची मुक्तता करण्याचीही मागणी केली. निकोलस मादुरो यांचा उल्लेख त्यांनी एकमेव राष्ट्रपती असाही केला. तसेच अमेरिकेला आक्रमणकारी देशही म्हटले.
कोण आहेत डेल्सी रॉड्रिग्स?
56 वर्षीय डेल्सी रॉड्रिग्ज यांचा जन्म 18 मे 1969 रोजी काराकस येथे झाला. डाव्या विचारसरणीचे नेते जॉर्ज अँटोनियो रॉड्रिग्ज यांच्या त्या कन्या आहेत. डेल्सी या निकोलस मादुरो यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. मादुरो यांनी त्यांचे वर्णन ‘सिंहिण’ असे केले होते. पेशाने वकील असलेल्या रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. 2013-14 मध्ये त्या माहिती व संचार मंत्री होत्या. 2014 ते 2017 पर्यंत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. 2018 मध्ये त्यांची व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आणि 2024 मध्ये त्यांच्या पेट्रोलियम मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.





























































