
अमेरिकेत चक्रीवादळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘किको’ने चांगलाच जोर पकडला असून या चक्रीवादळाने आपली लेव्हल बदलली आहे. चक्रीवादळ ताशी 215 किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ‘किको’ चक्रीवादळाचं सावट असतानाच पोस्ट ट्रॉपिकल चक्रीवादळ ‘लोरेना’नेदेखील रौद्र रूप धारण केले आहे, या दोन्ही चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या हे वादळ हवाईतील हिलोपासून 1,925 किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेला असून ते आता उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे. याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे चक्रीवादळ लोरेनामुळे मेक्सिकोत तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.


























































