
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव मान्य करायला तयार नाहीत. निवडणूक प्रक्रियेत आणि मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनसह इतर शहरातही ट्रम्प समर्थक शनिवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी निवडणूक निकालाला विरोध करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
ट्रम्प समर्थकांनी रस्त्यावर उतरत ट्रम्प यांच्या समर्थनार्थ फलक दर्शवत घोषणाबाजी केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रकिया आणि निकालाला त्यांनी विरोध दर्शवला. शनिवारी सकाळपासून व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझासह विविध भागात ट्रम्प समर्थकांनी एकत्र जमायला सुरुवात केली होती. ट्रम्प समर्थकांनी ‘फोर मोअर इअर्स’, ‘स्टॉप दी स्टील’, ‘वुई वॉन्ट ट्रम्प’ अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी ट्रम्प समर्थक आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पेन्सिलवेनिया, नेवाडा यासारख्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प समर्थकांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेत घोटळा करत अवैधपणे जनमत फिरवण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणूक निकालांचा आम्ही निषेध करत असून फेरमतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी ट्रम्प समर्थकांनी केली आहे. काही ठिकाणी मृतांच्या नावे मते टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. फेरमतमोजणी झाल्यास ट्रम्पच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टनमध्य ट्रम्प समर्थक रस्त्यावर उतरल्याने त्यांचे विरोधकही रस्त्यावर आले होते. त्यावेळी समर्थक आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली. काही ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मिरची पावडरचा वापर करावा लागला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सुरक्षेसाठी शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसच्या सुरक्षेततही वाढ करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. तसेच ट्रम्प पुढील कार्यकाळासाठी तयारी करत असल्याचे त्यांच्या प्रशासनातील मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले. तर आपण राष्ट्राध्यक्षपदावर राहणार किंवा नाही, हे येणारा काळच ठरवेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाबाबत आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
























































