
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. जगभरात या विषाणूने दीड लाख लोकांचा जीव घेतला असून 24 लाख लोकांना याची लागण झाली आहे. जगात अमेरिकेत या व्हायरसने सर्वाधिक 7 लाख लोक बाधित असून जवळपास 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढत असताना दुसरीकडे काही राज्यातील लोक रस्त्यावर उतरले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असतानाही अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अॅरिझोना, कोलोराडो, मोंटाना आणि वॉशिंग्टनमध्ये रविवारी रॅली काढण्यात आली. ‘आम्हाला स्वातंत्र्य द्या किंवा कोरोना’, असे फलक आंदोलकांच्या हातात दिसून आले. विशेष म्हणजे अमेरिकेत अर्ध्याहून अधिक राज्यात लॉकडाऊनविरोधात आंदोलने झाली आहेत.

कोरोनामुळे बंद पडलेल्या उद्योगांना खुले करावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन हटवण्यात यावं यासाठी जोरदार आंदोलनं होत आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले असून त्याला विरोध होत आहे.
मृतांचा आकडा 40 हजार पार
दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला अमेरिकेत 7 लाख 70 हजार रुग्ण असून 41 हजार 114 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 70 हजार 799 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 13 हजार 800 लोकांचा मृत्यू झाला आहे.


























































