
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत भाजपने हिंदू राष्ट्रवादाला हात घातला तर देशात धार्मिक दंगली भडकू शकतात असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. अमेरिकेच्या सिनेटसमोर याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा जगभरात दंगली, हिंसाचार किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यावर लक्ष ठेवून असते. याबाबतचा अहवाल नियमित पद्धतीने ही यंत्रणा तयार करीत असते. या अहवालामध्येच हा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे संचालक डॅन कोटस यांनी हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की “जरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष भाजपने कडवट हिंदुत्ववाद किंवा हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्दाला हात घातला तर हिंदुस्थानात लोकसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक दंगली भडकण्याची शक्यता वाढू शकते “
वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा जगभरात होऊ शकणाऱ्या विध्वसंक, उपद्रवी घटनांसंदर्भात एक अहवाल तयार करत असतात. हा अहवाल तयार करण्यामध्ये एफबीआय,सीआयए आणि डीआयएचे प्रमुख सहभागी असतात.
या अहवालामध्ये डॅन कोटस यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपशासित राज्यांमध्ये धार्मिक तेढ वाढली होती. काही राज्यांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चेतना जागृत करण्यासाठी तुरळक ठिकाणी हिंसेचे आधार घेतला. निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे होणारा हिंसाचार हा मुस्लिम दहशतवादाला खतपाणी घालणारा ठरू शकतो. देशातील तणावाचा फायदा इसिस उचलण्याचा प्रयत्न करू शकते. धार्मिक हिंसाचार घडल्यास हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले जाऊ शकतात. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर आणि सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढू शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे की लोकसभेच्या निवडणुका यावर्षी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होऊ शकतात.



























































