छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन निवडणुकीत गुंडांची दहशत

महापालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना छत्रपती संभाजीनगरात गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगरात भरदिवसा तलवारी नाचवत गुंडांनी दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर करत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्थेची पूर्णपणे मोडतोड झाली असून पोलीस यंत्रणा विरोधकांना धमकावण्यात गुंतली आहे. त्यामुळेच गुंडांची मस्ती दिवसाढवळ्या वाढत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगरात नशेत तर्र असलेल्या तीन तरुणांनी हातात तलवारी घेऊन परिसरात उच्छाद मांडला. या टोळक्याने भररस्त्यात तलवारी फिरवत सामान्य नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्हेगारांची दुचाकी आणि दोन तलवारी जप्त केल्या.