मिंधे गटाचा पत्ता कट, छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढवणार; अमित शहांनी दिले संकेत

महायुतीत सध्या जागावाटपावरून मोठा गोंधळ सुरू आहे. एकीकडे कोकण ठाणे, मावळ, रामटेक मतदारसंघांवरून वाद सुरू असताना आता छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघावर भाजपनेच दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: ही जागा भाजप लढवणार असल्याचे संकेत दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी ही जागा भाजपाला मिळणार असल्याचे संकेत दिले.या सभेत अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी छत्रपती संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता थेट अमित शहांनीच दावा ठोकल्यामुळे मिंधे गटाचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.