
लडाखमध्ये चीनच्या सीमारेषेवर अजूनही तणावाचे वातावरण आहे. लडाखच्या संघर्षाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या प्रत्येक इंच भूभागाच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. आपल्या देशाच्या एक इंच भूभागावरही कोणीच ताबा मिळवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनच्या सैनिकांनी हिंदुस्थानच्या हद्दीत प्रेश केला आहे काय, यावर शहा म्हणाले, चीनच्या प्रत्येक हालचालीवर सैन्य दलाची आणि सरकारची नजर आहे. सीमाभागात लष्कर सतर्क आहे. आपले जवान कोणत्याही परिस्थितीत शत्रूला आपल्या भूभागावर ताबा मिळवू देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार आणि सैन्य दल देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी सक्षम असल्याचे ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला बाधा येईल, अशी कोणतीही आगळीक खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमारेषवर तणाव असला तरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानिवडणुकीत सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार येईल, असेही ते म्हणाले. चीनसोबत तणाव वाढत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.



























































