अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारणारच, अमित शहा यांची घोषणा

791
amit-shah

‘अयोध्येतील राम मंदिरासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर  बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणी कितीही विरोध करो, आता  अयोध्येत गगनाला भिडणारे भव्यदिव्य राममंदिर उभारणारच, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडच्या लातेहारमध्ये भाजपच्या निवडणूक  प्रचारसभेत बोलताना केली.

राममंदिराच्या मुद्दय़ावरून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस व  अन्य काही पक्षांनी  गेली 70 वर्षे राममंदिर उभारणीच्या कार्यात अडथळे आणले. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भगवान रामचंद्रांचे मंदिर त्यांच्या जन्मस्थळीच होणार हे त्रिवार सत्य आहे, असेही शहा म्हणाले.

‘अयोध्येत मंदिर व्हावे, असे प्रत्येकाला वाटत होते, पण काँग्रेससह अन्य विरोधकांनी मंदिराचा खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचे की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढय़ा वर्षांपासून खटला पुढे सरकत नव्हता. अखेर  श्रीरामाच्या कृपेने आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राममंदिर उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे’, असे अमित शहा शेवटी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या