
सामना प्रतिनिधी । लखनौ
यंदा होणाऱया लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार यावे बस्स. मग बघाच, कश्मीर ते कन्याकुमारी आणि आसामपासून गुजरातपर्यंत एका एका घुसखोराला आम्ही कसे बाहेर काढतो ते, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गजरौला येथील भाषणात सांगितले. मात्र या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर शहा यांना ‘ट्रोल’ करण्यात आले. ‘घुसखोरांना हाकलायला आजवर कोणी रोखले होते?’ अशा सवालांचा माराच भाजप अध्यक्षांवर झाला.
गजरौला येथे भाजपच्या बूथ अध्यक्षांचा एक मेळावा पार पडला. त्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले असता शहा यांनी पुन्हा एकदा मोदींचेच सरकार आणा, असे आवाहन केले. केंद्रात मोदी सरकार पुन्हा आले तर उत्तर प्रदेश ‘उत्तम प्रदेश’ बनेल, असे सांगतानाच अयोध्येत राममंदिर बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
‘नेट’कऱ्यांचा हल्लाबोल
तरुणांना नोकऱया, रोजगार पाहिजे. पण ते काही मिळाले नाही. कश्मीरमधील कलम 370 हटवले नाही आणि मुलायम-मायावती हे तुरुंगात गेले नाहीत. राममंदिरही उभे राहिले नाही. आता ‘यूपी’ विसरून जा. स्वयंरोजगाराचे धडे तरुणांना देता, पण अल्पशा भांडवलातून काही उभे राहत नाहीत. एम.ए.पर्यंत शिकून पकोडे कोण विकेल. – अभय सिंह
‘फिर एक बार, मोदी सरकार’ असे आता बोलू नका. सरळ दुसरी बार बोला. ‘एक बार’मध्ये तर काहीच करता आले नाही तुम्हाला. – अजित गुप्ता
फिर एक बार, मोदी सरकार? मग आता सरकार कोणाचे आहे ते सांगा ना! – अक्षय कुमार
आजवर काय ‘जुमले’ सांगत होतात? – एक सोशल मीडिया यूजर



























































