नक्षलवाद मुळापासून उखडून टाकणार! गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या शूर जवानांनी थेट नक्षलवाद्यांच्या गुहेत घुसून कारवाई करताना आपल्या जिवांचे बलिदान केले आहे. या जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ दिले जाणार नाही. त्यांनी देशहितासाठी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबांचा बदला आम्ही घेऊ आणि देशातील नक्षलवाद मुळापासून उखडून टाकू, असा संतप्त इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडच्या माओवाद्यांना दिला आहे. बिजापूरच्या चकमकीत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ ) जवानांना जगदलपूर येथे श्रद्धांजली वाहताना शहा यांनी हा इशारा दिला.

छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीत शहीद झालेल्या सीआरपीएफ आणि पोलीस जवानांना वंदन करण्यासाठी आपण इथे आलो आहे असे सांगून अमित शहा म्हणाले, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या पराक्रमी कारवायांमुळे देशातील नक्षलवाद्यांची शंभरी आता भरत आलेली आहे. सुरक्षा बलांनी त्यांचे पंबरडेच मोडल्याने नक्षलवादी आता चवताळले आहेत.

शनिवारी रात्री बिजापूरच्या तारेम जंगलात झालेल्या चकमकीत आपले वीर जवान थेट नक्षलवाद्यांच्या गुहेतच घुसले होते हे आता स्पष्ट आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराचा पुरेपूर वचपा आम्ही घेणारच आहोत. शहीद जवानांचे हौतात्म्य आम्ही असे वाया जाऊ देणार नाही. सारा देश या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभा आहे. आता नक्षलवादाला मुळापासून उखडून फेकूनच केंद्र आणि राज्य सरकार थांबेल असेही शहा यांनी आपल्या भाषणात बजावले. श्रद्धांजली सभेनंतर गृहमंत्री शहा यांनी बांसगुडा येथील सीआरपीएफ शिबिरात जाऊन जवानांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी रायपूर येथे उपचार घेणाऱया जखमी सीआरपीएफ जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

या लढाईला आम्ही केंद्राच्या साथीने विजयात बदलू – मुख्यमंत्री बघेल

छत्तीसगडच्या नक्षलवादाविरुद्धची आणि हिंसाचाराविरुद्धची लढाई आम्ही केंद्र सरकारच्या हातात हात घालून लढणार आहोत. या लढय़ात आमचे आता नुकसान झाले असले तरी देशातील नक्षलवाद संपवण्याच्या पायरीपर्यंत आमची सुरक्षा बले पोचली आहेत. त्यांनी नक्षलवाद्यांच्या गडात घुसून त्यांना टक्कर दिली आहे. या लढाईला आम्ही नक्कीच विजयात बदलू ,असा विश्वास छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जगदालपूरच्या श्रद्धांजली सभेत बोलतांना व्यक्त केला. सुरक्षा बलांच्या बहाद्दर जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे नक्षलवाद्यांचे मोजकेच दिवस आता उरले आहेत हे नक्षलवाद्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही मुख्यमंत्री बघेल यांनी यावेळी दिला.