अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने जिंकली कराडकरांची मने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

कराडच्या समृध्द सांस्कृतिक परंपरेला चार चाँद लावणारा, महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेली सदाबहार गीते ‘अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप’च्या कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर सादर करून अवघ्या कराडकरांची मने जिंकली. कार्यक्रम पाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. ‘जिधर देखू तेरी तसविर..’ पासून सुरू झालेली ही संगीतमय सफर, ‘प्यार मे दिल पे मार दे गोली..,’ ‘जिसका मुझे था इंतजार..’, ‘लोग कहते है..’ ,’जुम्मा चुम्मा दे दे..’, ‘लुटे कोई मन का नगर..’ अशी उत्तरोत्तर अधिकच रंगत गेली.

अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप (एबीपी) कराड -सातारा आणि किशोर कुमार फॅन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते. तहसीलदार राजेश चव्हाण, मुख्याधिकारी यशवंत डांगे, मंघाराम टीव्हीएसचे जयराम सचदेव, पुरूषोत्तम गंगवाणी, ए.के.पाटील, विजय वाटेगावकर, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे, किशोर कुमार फॅन क्लबचे अध्यक्ष संजय बदियाणी, दीपक प्रभावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

किशोर कुमार फॅन क्लब आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रूपच्या कलाकारांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यांचा सुरेल नजराणा सादर केला. डॉ. हेमंत जानुगडे यांच्या ‘जिधर देखू तरी तसविर..’ या गीताने कार्यक्रमास सुरूवात झाली. यानंतर संजीव नाईक यांनी ‘माय नेम इज अँथोनी..’ हे गीत त्याच अदाकारीत सादर केले. ‘जिसका मुझे था इंतजार..’ हे गीत डॉ. नितीन जाधव व स्नेहा सोहोनी यांनी तर ‘लोग कहेते है मै शराबी हूं’ हे गीत संजय बदियाणी यांनी उत्कृष्टपणे सादर केले. टाळ्यांच्या कडकडाटात रसिक प्रेशकांनी या कलाकारांना दाद दिली.

सागर व श्रृती शिराळकर यांनी सादर केलेल्या प्यार मे दिल पे मार दे गोली या गीताने कार्यक्रमात रंगत आणली. सतीश भोंगाळे आणि अजय भट्टड यांनी ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा…’हे गीत सादर केले. श्रीकांत जोशी यांनी ‘मै पल दो पल का शायर हूँ..’ आणि शेखर गायकवाड व डॉ. शुभा दीक्षित यांनी ‘अपने प्यारके सपने सच हुये..’ या गीतांना रसिकांमधून वन्स मोअरची मागणी झाली. सतीश मोरे व स्नेहल दोशी यांच्या ‘सलामे इश्क..’ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रम उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला. एका सरस एक सादर होणाऱ्या गीतांना प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून उत्स्फूर्त दाद देत होते.

डॉ.अनिरूध्द दीक्षित यांनी गिटारवर ‘इंतहा हो गई.. ‘ या गातीचे अतिशय सुरेल वादन केले. प्रेक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. अजय भट्टड यांनी ‘अरे दिवानो..’ तर अजय व आरती बैंदुर या जोडीने ‘जुम्मा चुंम्मा दे दे..’ गीत सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला.

सतीश व विद्या मोरे या नवख्या जोडीने ‘लुटे कोई मन का नगर ..’ हे गीत सादर करून उपस्थिताची मने जिंकली. विनायक औंधकर यांनी ‘तेरे जैसा यार कहा..’ हे गीत तेवढ्याच ताकदीने सादर केले. मंगेश हिरवे यांनी ‘जहॉं चार यार मिल जाये..’ हे गीत सहजतेने आणि सुरेल आवाजात सादर केले. ‘इक दुसरे से करते है प्यार हम…’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रारंभी विजय पाटील यांच्या कवितेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. हिम्मत खराडे म्हणाले, कराडला सांस्कृतिक वारसा आहे. तो जतन करण्याचे काम स्थानिक कलाकार करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेसह विधायक उपक्रम राबवून अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने चांगला संदेश दिला आहे. यशवंत डांगे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

विजय पाटील, खजिनदार सतीश भोंगाळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राहूल खोचीकर, प्रबोध पुरोहित यांनी केले. सचिव राहूल पुरोहित यांनी आभार मानले.