अभिनंदन पा!… अजून 50 वर्षे! अमिताभ यांची बॉलीवूड पन्नाशी, अभिषेकचे भावुक ट्विट

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला आज 50 वर्षे पूर्ण झाली. या खास दिवशी मुलगा अभिषेक बच्चनने त्यांना अनोखा सलाम ठोकला.  अभिषेकने अमिताभ यांचा मुलगा म्हणून नव्हे तर फॅन म्हणून इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून ‘अभिनंदन पा… आता पुढच्या 50 वर्षांची वाट बघतोय’ असे भावुक ट्विट केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये ‘सात हिंदुस्थानी’ या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर पुढची 50 वर्षे अमिताभ यांनी बॉलीवूडमध्ये बच्चन राज केले. हा बच्चन कालखंड जागवत अभिषेकने अमिताभ यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिग बी खुर्चीवर हात ठेवून दुसरीकडे बघत आहेत. त्यासोबत अभिषेकने लिहिलंय, ‘केवळ मुलगा म्हणून नव्हे तर अभिनेता आणि फॅन म्हणूनही, आम्ही सर्वच तुमच्या भव्यतेचे साक्षीदार आहोत. तुमचा आदर करण्यासारखे, तुमच्याकडून शिकण्यासारखे आणि तुमचे कौतुक करण्यासारखे किती आहे…सिनेमाप्रेमींच्या अनेक पिढय़ा हे अभिमानाने सांगतात की आम्ही बच्चन यांचा काळ जगलो. सिनेसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन पा. आम्ही आता पुढच्या 50 वर्षांची वाट बघतोय.’

आपली प्रतिक्रिया द्या