उत्तर प्रदेशचे 850 शेतकरी कर्जमुक्त होणार, अमिताभ बच्चन फेडणार कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कर्जाची परतफेड करणे शक्य नसलेल्या उत्तर प्रदेशच्या 850 शेतकऱयांचे कर्ज बिग बी अमिताभ बच्चन फेडणार आहेत. या आधीही त्यांनी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱयांचे कोटय़वधीचे कर्ज फेडले आहे. सामाजिक बांधिलकीतून बॉलीवूडमधील अनेक अभिनेते शेतकरी, जवान यांना आर्थिक मदत करत असतात. त्यात बच्चनही आघाडीवर आहेत.

‘कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱयांना त्यातून बाहेर काढण्याचे काम मनाला समाधान देणारे आहे. आपल्याकडील काही आपल्या देशबांधवांना देणे, खरोखरच सुखद अनुभव आहे. ‘शहीद’ ही महाराष्ट्रातील संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करत आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांतील शेतकऱयांसाठी काही केले गेले पाहिजे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कर्ज फेडता न आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. ते आत्महत्या करू नयेत म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. या आधी आंध्र प्रदेश आणि विदर्भातील शेतकऱयांचे कर्ज फेडले आहे. आता उत्तर प्रदेशमधील सुमारे 850 शेतकऱयांचे साडेपाच कोटींचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मी उचलली आहे, असे ब्लॉगद्वारे त्यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन फेडणार कर्ज, अजित सिंहलाही मदत करणार
‘केबीसी कर्मवीर’ कार्यक्रमात आलेल्या अजित सिंह यालाही ते मदत करणार आहेत. अपहरण करून वेश्याव्यवसायात बळजबरीने आलेल्या मुलींची सुटका करून त्यांच्या कल्याणासाठी अजित सिंह काम करतात. त्यांनाही मदतीचा हात देणार असल्याचे बच्चन त्यांनी सांगितले.

summary- amitabh bachchan to remit farmers of uttar pradesh