
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी लष्करात वापरण्यात येणाऱ्या आरडीएक्सचा वापर केला होता. असा खळबळजनक खुलासा फॉरेन्सिक एक्सपर्टसने केला आहे. इतर स्फोटकांपेक्षा आरडीएक्स स्फोटकाची तीव्रता अधिक असल्यानेच दहशतवाद्यांनी त्याचा वापर केला होता. दहशतवाद्यांना हे आरडीएक्स पाकिस्तानच्या सैन्याने दिले होते, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणाच्या हाती लागली आहे.
पुलवामा येथील सीआरपीएफच्या हल्ल्यानंतर या हल्ल्याचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. यावेळी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे व स्फोटकाचा साठा आधीच हिंदुस्थानात आणला गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही स्फोटके कारमधून सहज नेता येण्यासारखी असल्यानेच या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने कारचा वापर केला. हल्ल्याच्या ठिकाणापासून आठ किलोमीटर अंतरावर ही स्फोटके तयार करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी 50-70 किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर केला होता. ही स्फोटके तयार करण्यासाठी पाकिस्तानहून खास प्रशिक्षक हिंदुस्थानमध्ये आले होते. हल्ल्याच्या काहीवेळाआधीच यात ट्रिगर स्विच, डेटोनेटर आणि पाॅवर फ्यूज बसवण्यात आले होते, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.



























































