अमरावती – कनिष्ठ अभियंत्याला 2 लाखांची लाच घेताना पकडले, ACBची मोठी कारवाई

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एका कनिष्ठ अभियंत्याला अटक झाल्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी पराग पद्माकर कठाळे (35 वर्षे) यांना अटक केली आहे. कठाळे हे शेंदुर्जना घाट नगर परिषदेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- वर्ग 3 म्हणून कामाला आहेत. कठाळे यांच्याविरोधात एका कंत्राटदाराने तक्रार केली होती.

तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराने नगर परिषद शेंदुर्जना घाट येथील जलतरण तलावाचे काम केलं होतं. या कामाची त्रयस्थ संस्थेकडून पाहणी करून कामाबाबतचा अहवाल देण्यात येणार होता. ही पाहणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती यांच्याकडून करण्यात येणार होती. या तपासणीचा अहवाल कंत्राटदाराच्या बाजूने देण्यासाठी कठाळे यांनी कंत्राटदाराकडे ही लाच मागितली होती. कामाच्या एकूण बिलाचा एक टक्का याप्रमाणे 2 लाख रुपये कठाळे यांनी कंत्राटदाराकडे मागितले होते. कंत्राटदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. ज्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित सापळा रचत कठाळे यांना ही रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई वरुड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानमध्ये करण्यात आली.