
अमरावतीमध्ये खासदार विरूद्ध पोलीस आयुक्त असा संघर्ष उभा राहिला आहे. अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे तिथलं राजकीय वातावरण तापलं आहे. या हत्याप्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आयुक्त सिंह यांनी उत्तर दिले आहे. आमदार रवी राणा आणि त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे खासदार नवनीत राणा या आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचं आरती सिंह यांनी म्हटलं आहे.
21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद बोलावली होती.
खासदार नवनीत राणा यांनी आरोप केला होता की कोल्हे यांची हत्या ही चोरीसाठी करण्यात आल्याचं दाखवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. अमरावतीमध्ये दिवसेंदिवस चोऱ्या, दंगली, बेकायदेशीर धंदे वाढले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राणा यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिलं होतं.
कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली जात होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
अमरावतीचे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. याचा राग आल्याने नवनीत राणा या आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचं पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फेब्रुवारी महिन्यात रवी राणा यांच्याविरोधात अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आपल्यावर खोटे आरोप व्हायला सुरुवात झाली असे आरती सिंग यांनी म्हटले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ या वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.


























































