अमरावती- गाडी आणि ऑटोरिक्षाचा अपघात; दोन ठार, पाच जखमी

चांदूर बाजार-अमरावती मार्गावर असलेल्या बोराळा फाट्यावर झालेल्या स्विफ्ट डिझायर व ऑटोत धडक झाल्यामुळे दोन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली.

मुळचे जवळा, शहापूर येथे राहणारे रविंद्र विधळे कुटुंबासह शेती पाहण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी मिनाक्षी रविंद्र विधळे व 11 वर्षीय आयुष हा मुलगा होता. हे सर्व जण चांदूर बाजारवरून अमरावतीकडे परतत असताना पुसद्यावरून एक ऑटो चांदूरबाजारकडे जात होता.

दोन्ही वाहनांची परस्परांसमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 11 वर्षीय आयुषचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ऑटोत असलेले संजय निळकंठ अंबुलकर (वय 55, रा.काटसूर) यांचासुद्धा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑटोतील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सुद्धा अमरावतीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्विफ्ट डिझायरमध्ये असलेले शिक्षक रविंद्र विधळे व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या