माँसाहेबांची भूमिका हा माझा सन्मानच, अभिनेत्री अमृता राव ‘ठाकरे’ सिनेमातील वेशभूषेत शिवाजी पार्कवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘ठाकरे’ चित्रपटात प्रबोधनकारांची सून आणि देशातल्या एका प्रभावशाली नेत्याची पत्नी अशा दोन भूमिका माँसाहेबांच्या रूपात एकाच वेळी वठवायच्या हे आव्हानात्मक होते, अशी प्रांजळ कबुली देतानाच माँसाहेबांची भूमिका मिळाली हा माझा सन्मानच आहे असे अभिनेत्री अमृता राव हिने आज सांगितले. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अमृता हिने आज शिवाजी पार्क येथील माँसाहेबांच्या पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले. ‘ठाकरे’ चित्रपटातील माँसाहेबांच्या वेशात आलेल्या अमृताला क्लिक करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

माँसाहेब कशा होत्या, त्यांचे राहणीमान, ‘मातोश्री’मधील त्यांचा वावर याविषयी कोणतीही माहिती, व्हिडीओ उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही भूमिका म्हणजे आव्हानच होते असे सांगताना स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्यच आहे अशी कृतज्ञताही अमृता राव हिने यावेळी व्यक्त केली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत प्रस्तुत आणि राऊटर्स एंटरटेन्मेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘ठाकरे’मधील अमृताच्या लुक्सची चर्चा
‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अमृता आज पहिल्यांदाच या चित्रपटातील तिच्या ‘गेटअप’मध्ये म्हणजे माँसाहेबांच्या रूपात सर्वांसमोर आली. शिवाजी पार्कमध्ये तर अमृताच्या साध्या आणि सामान्य गृहिणीच्या लुक्सचीच चर्चा होती. माध्यमांच्या छायाचित्रकारांबरोबरच शिवाजी पार्कमधील उपस्थित इतर लोकांनाही अमृताची म्हणजेच तिने साकारलेल्या माँसाहेबांची एक छबी टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

शिवाजी पार्कमधील आठवणींना उजाळा
अमृताचे शालेय शिक्षण शिवाजी पार्क परिसरातच झाले. त्यावेळी ती फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्कात यायची. माँसाहेबांच्या पुतळय़ाविषयीची एक आठवण तिने सांगितली. मी शाळेत असताना माँसाहेबांच्या निधनाची बातमी आली होती. त्यावेळी त्यांना श्रध्दांजली म्हणून आमच्या शाळेला सुट्टी देण्यात आली होती. कालांतराने हा पुतळा उभा राहिला. या पुतळय़ाच्या रूपात तेव्हा प्रथमच मी माँसाहेबांना पाहिले होते आणि आज त्यांचीच भूमिका मी करतेय हा मला मिळालेला सन्मानच आहे, असे अमृता म्हणाली.

उद्या शानदार म्युझिक लाँच
‘ठाकरे’ सिनेमाचे शनिवार, 12 जानेवारी रोजी शानदार म्युझिक लाँच होणार असून या सोहळय़ाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खास उपस्थित राहणार आहेत. वांद्रे येथील ताज लॅण्डस् एण्ड या पंचतारांकित हॉटेलात सकाळी 10.30 वाजता हा सोहळा रंगणार आहे. यावेळी प्रमुख कलावंत नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, चित्रपट निर्माते संजय राऊत, संगीतकार रोहन -रोहन, गायक नकाश अझीझ, वायकॉम 19 चे सीओओ अजित अंधारे, कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे चेअरमन श्रीकांत भसी, वर्षा राऊत, पूर्वशी राऊत, विधिता राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित राहणार आहेत.