अमूलचे दूध 2 रुपयांनी महागणार, यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा वाढले दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) हिंदुस्थानातील सर्व बाजारपेठांमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. हे नवे दर मंगळवारपासून लागू होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात दुधाच्या दरात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे.

गुजरातच्या अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत, अमूल गोल्ड आता प्रति 500 ​​मिली 30 रुपये, अमूल ताजा 24 रुपये प्रति 500 ​​मिली आणि अमूल शक्ती 27 रुपये प्रति 500 ​​मिली दराने विकले जाईल. उर्जा, पॅकेजिंग, रसद, पशुखाद्याचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, आमच्या सदस्य शेतकऱ्यांच्या संघटनांनीही किमतीत 35 ते 40 रुपये प्रति किलो फॅटची वाढ केली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 5% पेक्षा जास्त आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी जरी केलेल्या जीएसटी अधिसूचनेमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेले नॉनब्रँड प्री-पॅक केलेले अन्नधान्य, डाळी तसेच दही, बटर मिल्क आणि लस्सी यांच्यावर 5% कर लावला. याविरोधात व्यापारी संघटनांनी शनिवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. केंद्र सरकारच्या जीएसटी अधिसूचनेमुळे धान्य आणि डाळींच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.