
महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात नेहरु रस्त्यावरील सोनवणे हाॅस्पिटलसमोर सोमवारी घडली. लिला कचरदास लाहोटी (वय 75, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चालक शाजीब शाहनूर शेख (वय 33, रा. एसटी कॉलनी, सातारा रस्ता) याला अटक केली आहे.
दिवाळीनिमित्त लाहोटी दाम्पत्य सोमवारी (24 ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास नाना पेठेतील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी नेहरु रस्त्याने निघाले होते. महापालिकेच्या सोनवणे हाॅस्पिटलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी लिला चाकाखाली सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. दिवाळीच्या सकाळी अपघातात ज्येष्ठ महिला मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करत आहेत.

























































