हंस’, ‘मोहिनी’ व ‘नवल’ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि लेखक आनंद अंतरकर यांचे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (कै. ग. दि. माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू असा परिवार आहे. सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर या त्यांच्या भगिनी होत.
हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते. 75 वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर यांनी दिली.
1966 साली वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या विविध मासिकांच्या प्रत्यक्ष संपादनाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आजपर्यंत (तब्बल 55 वर्षे) टिकवून धरली. इंग्रजी, हिंदी कथांचे अनुवाद, स्वतंत्र कथालेखन, ललित कथालेखन आदी प्रकारच्या साहित्याचे गेली जवळपास 25 वर्षे लेखन केले. ‘झुंजुरवेळ आणि रत्नकीळ’ ही पहिली दोन ललित पुस्तके प्रकाशित झाल्यावर लेखक म्हणून मान्यता मिळू लागली. ‘छायानट’ हे त्यांनी स्वतः काढलेल्या छायाचित्रांशी निगडित आठवणींवर पुस्तक प्रसिद्ध झाले. जी. ए. कुलकर्णी यांच्याबरोबरच्या पत्रव्यवहारावर आधारित एक ‘धारवाडी कहाणी’ ही ललितकृती प्रकाशित केली. ‘अंतर्नाद’ मासिकामध्ये वर्षभर ‘अक्षरछाया’ सदर लेखन केले. ‘घूमर’ आणि ‘सेपिया’ (व्यक्तिचित्रण) ही त्यांची अलीकडच्या काळातील दोन लक्षवेधी पुस्तके ठरली.


























































