
दलित आणि मुस्लिम आपल्यासोबतच असल्याच्या स्वप्नामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसंदर्भात काँग्रेसला अजूनही गांभीर्य नाही, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
Breaking : वंचित आघाडीत ‘बिघाडी’, एमआयएमचा स्वबळाचा नारा
पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील दोन अभ्यासक्रमांच्या औपचारिक उद्घाटन समारंभासाठी आनंदराज आंबेडकर संभाजीनगरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दलित, मुस्लिम समाज काँग्रस-राष्ट्रवादीसोबत असल्याचा भ्रम आहे, या दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पक्ष सोडून जात असल्याने त्यांच्याजवळ उमेदवार देण्यासाठी माणसे शिल्लक राहिलेली नाहीत. काँग्रेससोबत ‘वंचित’ने 144 जागांची मागणी केली होती. काँग्रेसने राष्ट्रवादीला त्यांच्या कोट्यातूनच उमेदवारी देण्यास आमची हरकत नव्हती. तर वंचित आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना उमेदवारी देणार असल्याचे ठरले होते. मात्र काँग्रेस आघाडी करण्यासंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला फारसे महत्त्व दिले नाही. राजकारणापेक्षा आंबेडकरी समाज सशक्त कसा करता येईल याकडे लक्ष देत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्रात 15 जागांची मागणी ‘वंचित’कडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस मिलिंद बनसोडे, आनंद कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



























































