निमित्त – एआयचा संगीत प्रयोग

>> अनंत पावसकर

एआय अनेक क्षेत्रांत क्रांती घडवून आणत आहेच. आता इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कलेच्या म्हणजे संगीताच्या क्षेत्रातही एआयद्वारे नवीन प्रयोग होत आहेत. नुकताच संगीतकार ए. आर. रेहमान याने असा प्रयोग केला आणि रसिकांच्या कौतुकासोबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले.

माणसाला जिथे विशेष बुद्धीची गरज असते, ती बरीच कामे आता संगणकीय प्रणाली करू लागल्या आहेत. एआय अर्थात कृत्रिम गुणवत्तेद्वारे (आर्टिफिशल इंटेलिजन्स) असे वेगवेगळे प्रयोग केले जातात. एआय ही ‘टेक्नॉलॉजी’ मानवनिर्मितच आहे, परंतु निर्जीव यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विचार करण्याची क्षमता बहाल करणारी आहे. सध्या जगभरात आर्टिफिशल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर्स उपलब्ध झाली आहेत.

हे झालं आर्टिफिशल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान, यंत्रे, संशोधन या क्षेत्रातील कार्य, परंतु हीच एआय टेक्नॉलॉजी आपल्या संगीत क्षेत्रातसुद्धा येतेय ही बाब कुणालाही सहज पचणारी नाही. मात्र यातसुद्धा मतमतांतरे आहेत. नुकताच हिंदुस्थानला पहिला ‘ऑस्कर’ मिळवून देणारा संगीतकार रेहमान सध्या या एआयमुळे चर्चेत आला आहे. ए. आर. रेहमानने दिवंगत गायक बंबा बाक्या आणि शाहुल हमीद यांचे आवाज एआयच्या सहाय्याने पुनरुज्जीवित केले आहेत. सुपरस्टार रजनीकांत अभिनित ‘लाल सलाम’ (2024) या तामीळ चित्रपटासाठी एक गाणे त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करून सादर केलं आहे. या प्रयोगाने संगीत क्षेत्रातील सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. काही लोकांना रेहमानसारख्या दिग्गज संगीतकाराने एआयचा संगीतात केलेला वापर खटकला आहे, तर काहींनी रेहमानच्या कृतीचं कौतुक आणि समर्थनसुद्धा केलं आहे.

‘लाल सलाम’ (9 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रदर्शित) चित्रपटात ‘थिमिरी येजुदा…’ असे शब्द असलेलं, गीतकार ‘स्नेहन’ यांचं गाणं दिवंगत बंबा बाक्या, शाहुल हमीद आणि दीप्ती सुरेश, अक्षय शिवकुमार यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं 26 जानेवारी, 2024 रोजी श्री लिओ मुत्थू इनडोअर स्टेडियममध्ये थाटामाटात प्रकाशितसुद्धा करण्यात आले. याबाबत रेहमानने स्पष्टीकरणही दिले आहे. रेहमानने आपली बाजू मांडताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. “आम्ही या दिवंगत गायकांच्या आवाजाचा एआयच्या माध्यमातून प्रयोग करण्याआधी त्यांच्या कुटुंबीयांकडून रीतसर परवानगी घेतली. या प्रयोगात मला सध्या तरी केवळ 70 टक्के यश आलं आहे. एक दिवस अचानक माझ्या एका सहकाऱयाने ‘निधन’ झालेल्या एका दिवंगत गायकाच्या आवाजाचा नमुना पाठवला होता. आपण यावर काहीतरी ‘क्रिएटिव्ह’ करू या, असं त्यानं त्या व्हॉटस्अॅप मॅसेजमध्ये लिहिलं होतं. आधी तो मेसेज वाचल्यानंतर खरं तर संभ्रमात होतो, आम्ही त्या आवाजाचा अभ्यास केला. सुदैवाने ‘लाल सलाम’ या चित्रपटाची दिग्दर्शिका ऐश्वर्या यांचीही साथ लाभली.  यावर काहीतरी नवं करायच्या ईर्षेने थेट मी दिवंगत जीनियस गायक बंबा बाक्या आणि शाहुल हमीद यांच्या व्हॉईस-मॉडेलवर अभ्यासपूर्ण संशोधन करायला घेतलं. ते काही प्रमाणात यशस्वी होतंय. त्यासाठी रीतसर परवानगी मिळवायलाच हवी हे ध्यानात आलं. याबाबतच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आणि पुढे गाणे तयार केले.’’

हा प्रकार आपल्या संगीत क्षेत्रासाठी खरोखरच धक्कादायक होता. कारण नंतर त्यावर तिथल्या लोकांच्या अतिशय तिखट अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. लोक संतापले असल्याचे व्हिडीओ वायरल झालेत. हा बंबा बाक्या कोण, तर बंबा बाक्या म्हणजे बक्कियाराज (जन्म 31 ऑक्टोबर, 1980, मृत्यू दि. 2 सप्टेंबर, 2022). तो रेहमानच्या टीममधलाच त्याचा जिव्हाळय़ाचा मित्र होता आणि शाहुल हमीद (1953-1978) हा कोण, तर एक जीनियस तामीळ पार्श्वगायक! (तो रेहमानसोबत ‘थिरूडा थिरूडा…’मध्ये होता). तर ‘थिमिरी येजुदा…’ हे गाणं सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ‘ऐश्वर्या’ दिग्दर्शित ‘लाल सलाम’ या चित्रपटात आहे.

याबाबतीत रेहमानला नवं काहीतरी केल्याबद्दल इतका आनंद आहे की, तो व्यक्त होत म्हणाला…एआय हे सध्याच्या तंत्रज्ञानातलं ‘हॉट बटन’ वापरून आपल्या भूतकाळातील अनेक दिग्गज गायकांचे ‘व्हाईस मॉडेल’ वापरत नवनवे आविष्कार आपण सहज सादर करू शकतो.  आपल्या हृदयात मानाचं स्थान असलेल्या अत्यंत आवडत्या, परंतु दिवंगत असलेल्या गायकाचा आवाज, एआयच्या सहाय्याने पुनरुज्जीवित झाला आहे ही गोष्टच सुखद आहे. फक्त त्या त्या गायकांच्या वारसांनी आमच्या या प्रयोग म्हणून करत असलेल्या आविष्कारासाठी आपलेपणाने स्वीकृती द्यायला हवी. तसंच हा प्रयोग करून आविष्कार करणाऱया तंत्रज्ञांनी त्यांना यथोचित मानधन देत त्याची कायदेशीर पूर्तता करायला हवी. यावर ए. आर. रहेमानच्या व त्याच्यावर आत्यंतिक प्रेम करणाऱया अनेक समर्थकांनी त्याचं कौतुक करत त्याला आपलेपणाने विनवलं आहे की… त्याने एस. पी. बालसुब्रमण्यमच नव्हे, तर महंमद रफी, किशोर कुमार, मुकेश, तलत मेहमूद आणि लतादीदी यांचे आवाज योग्य त्या सादरीकरणासाठी नक्कीच पुनरुज्जीवित करावेत. त्यामुळे या आमच्या लाडक्या गायकांचा आवाज अजरामर होईल.’

एआय हे उत्पादन व औद्योगिकसह अनेक क्षेत्रांत भले नवा स्रोत आणेल, क्रांती घडवून आणेल, परंतु एआय ही गोष्ट आपल्या संगीत क्षेत्रात ज्या प्रकारे आली आहे, ती प्रथमदर्शनी तरी आपल्याला सहज पचणारी बाब नाही, परंतु यावर बरंच संशोधन होणार, सतत नव्याच्या शोधात असणारे तंत्रज्ञ त्यात नवनवीन प्रयोग करणार. संगीत क्षेत्रातले ‘टेक्नो-सॅव्ही’ संगीतकार, वादक यातून नवीन गोष्टींचा आविष्कार करणार यात शंकाच नाही. मात्र भविष्यात आणखी काय काय होणार हे याक्षणी एआयसुद्धा सांगू शकणार नाही.

[email protected]