ठसा : प्रकाश सेनगावकर

2167

>> विजय जोशी

निवेदनाच्या वेगवेगळ्या पैलूंना आकार देत आपले निवेदन खुमासदार शैलीत सादर करणारे मराठवाडय़ाचे प्रख्यात निवेदक प्रकाश सेनगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ज्या कार्यक्रमात त्यांचे खुमासदार निवेदन असे तो कार्यक्रम कमालीचा रंगतदार होत असे. निवेदन ऐकण्यासाठी रसिक उपस्थित असत, पण आता तसे खुमासदार निवेदन दिसणार नाही. नांदेड शहरात झालेल्या अनेक सभा, संमेलनांना त्यांचे निवेदन लाभले. त्या अविस्मरणीय आठवणी मागे ठेवून प्रकाश सेनगावकर चिरंतनाच्या प्रवासास गेले. त्यांच्या निवेदनाचे कार्यक्रम नांदेडातच नव्हे, मराठवाडय़ात कुठेही सांस्कृतिक कार्यक्रम असो वा धार्मिक, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सेनगावकरांचे असावे, अशीच बहुसंख्य प्रायोजकांची आणि संयोजकांची इच्छा असायची. 40 वर्षांहून अधिक काळ निवेदन, संचालन यात पकड घट्ट करून असलेल्या सेनगावकरांचा जन्म 7 फेब्रुवारी 1955 रोजी वसमत तालुक्यातील कौठा येथे झाला. यशस्वी निवेदक आणि सूत्रसंचालक या भूमिका त्यांनी नुसत्या केल्या नाहीत तर त्या भूमिका ते जगले. कार्यक्रम खुलवत जाणं आणि खुलवत ठेवणं ही गमके त्यांनी जाणली होती. विद्यार्थी जीवनापासून सेनगावकर यांचे मन वाचन, मनन आणि अभिनयाकडे ओढले होते. महाविद्यालयातील अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या वाचनातून आणि अभिनयातून त्यांच्यातला सूत्रसंचालक घडला. बीएससीच्या पहिल्या वर्षाला असतानाच त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नोकरी लागली आणि बँकेच्या या नोकरीबरोबर त्यांनी सूत्रसंचालक म्हणूनही काम सुरू केले. आपल्या मिश्किल स्वभावामुळे त्यांना कार्यक्रमात विनोदाचा अभिनय करावा लागला नाही, तर तो त्यांच्या संचालनातून सहजपणे व्यक्त होत असे. गाण्यांच्या कार्यक्रमापासून निवेदनाची सुरुवात त्यांनी केली. हिमांशू कुलकर्णी यांच्या गजलांच्या कार्यक्रमाच्या वेळी कविवर्य फ. मुं. शिंदे यांनी केलेल्या निवेदनातून त्यांनी स्फूर्ती घेतली आणि सूत्रसंचालनात आपला जीव ओतला. प्रहसनाने वाचनातून मिळालेल्या विनोदी किश्श्यांनी त्यांचे निवेदन लोकप्रिय झाले. कवितांचे अभिवाचन, नाटकातले प्रवेश सादर करणे यामुळे प्रकाश सेनगावकर यांचे संचालन अधिक भावूक व भावणारे झाले. ज्येष्ठ व त्यांच्या नकला प्रकाश इतक्या सहजतेने आणि हुबेहूब करत की श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. एखादा फर्डा वक्ता सभेची तयारी जितका मन;पूर्वक करतो तितक्याच एकात्मतेने प्रकाश आपल्या सूत्रसंचालनाची तयारी करीत असत. कार्यक्रम होण्याआधी त्याचा अभ्यास करून, त्या क्षेत्रातील दिग्गजांना भेटून त्यांच्याशी बोलून ते आपल्या संचालनात स्क्रीप्ट लिहीत असत. निवेदन कौशल्य आपल्या व्यासंगातून वाढवत त्यांनी निवेदनाला दर्जा दिला. संजय जोशी यांच्यासोबत गीतरामायणाचे एक हजार प्रयोग करणाऱया या निवेदकाने गीतरामायणाच्या प्रत्येक कार्यक्रमात वेगळय़ा पद्धतीचे नियोजन करून त्यातील रटाळपणा दूर केला हे विशेष. कार्यक्रमाची रंगत आपल्या व्यासंगात, अभिनयात खुलवणारा हा कलावंत निवेदक आपल्यातून निघून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या