अंधेरीत ‘बेस्ट’ बसला पुन्हा आग; प्रवासी थोडक्यात बचावले, महिनाभरातील तिसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीत आज ‘बेस्ट’च्या बसला आग लागल्याची घटना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. बसचा शेवटचा स्टॉप असल्याने प्रवासी उतरल्याने अगदी थोडक्यात बचावले. दरम्यान, संबंधित 412 बसेसची सेवा पुरवणार्‍या ‘मातेश्वरी’ कंपनीची सेवा तातडीने थांबवण्याचे आदेश कंपनीला ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

अंधेरी पूर्वमध्ये सायंकाळी 6.55 वाजता ‘टाटा-सीएनजी’च्या या बसने अचानक पेट घेतला. 415 क्रमांकाची ही बस सिप्झवरून अंधेरी स्टेशन आगरकर चौक येथे आली असता प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती. मात्र हा शेवटचा स्टॉप असल्याने सर्व प्रवासी उतरले होते. यानंतरच बसने पेट घेतला. यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बस आगीत जळून खाक झाली. दरम्यान, 25 जानेवारी आणि 11 फेब्रुवारी रोजी ‘मातेश्वरी’ कंपनीच्याच बसला आग लागल्याची घटना घडली होती.

36 मार्गांवर सेवा कोलमडणार

– ‘बेस्ट’च्या साडेतीन हजार बसेस रस्त्यावर दररोज धावतात. यामध्ये ‘बेस्ट’च्या स्वत:च्या गाड्यांसह भाडेतत्त्वावरील गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील ‘मातेश्वरी’ कंपनीच्या माध्यमातून धारावी, मजास, सांताक्रुझ आणि, प्रतीक्षानगर आगारात सेवा पुरवली जाते.

– मात्र गेल्या एकाच महिन्यात ‘मातेश्वरी’ कंपनीच्या बसला तिसर्‍यांदा आग लागल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने कंपनीला सेवा थांबण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत अशा दुर्घटना रोखण्याची हमी दिली जात नाही, तोपर्यंत सेवा पुन्हा घेणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

‘बेस्ट’ प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे संबंधित ‘मातेश्वरी कंपनी’ने सुरक्षेची हमी दिल्याशिवाय त्यांना सेवेत पुन्हा घेण्यात येणार नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. – लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, ‘बेस्ट’